Join us

लाचखोर पो़ कॉ़ राठोडविरोधात गुन्हा दाखल जामखेड येथील घटना: लाचलुचपत विभागाची कारवाई

By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST

अहमदनगर: पकडलेली दुचाकी परत मिळावी, यासाठी न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करणारा पोलीस काँस्टेबल राहुल राठोड यास लाचलुचपत विभागाने अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

तक्रारदाराची दुचाकी पकडून ती जामखेड पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली होती़ ही दुचाकी परत मिळावी, अशी मागणी तक्रारदाराने पोलिसांकडे केली़ ही दुचाकी परत देण्यासाठी न्यायालयात सकारात्मक अहवाल सादर करतो़ पण त्या बदल्यात १५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी जामखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पो़ कॉ़ राठोड याने तक्रारदाराकडे केली़ पोलिसानेच अशी पैशांची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला़ प्राप्त माहितीच्या आधारे लाचलुचपत विभागाचे पोलीस उपधीक्षक इरफान शेख, पोलीस निरीक्षक विजय मुतडक, पो़ हे़ काँ़ सुनील पवार, वसंत वाव्हळ, काशिनाथ खराडे, पो़ ना़ रवींद्र पांडे, अंबादास हुलगे यांनी सापळा लावून राठोड यास अटक केली़ या प्रकरणी राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सरकारी कामाच्या बदल्यात पैशांची मागणी केल्यास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत विभागाकडून करण्यात आले आहे़