Join us

कॉल ड्रॉप्स टाळण्यासाठी देशात २९ हजार नवे मोबाईल मनोरे

By admin | Updated: December 24, 2015 00:20 IST

कॉल ड्रॉप्सच्या समस्येला सरकारने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी देशात २९ हजार नवे मोबाईल टॉवर उभारले आहेत

नवी दिल्ली : कॉल ड्रॉप्सच्या समस्येला सरकारने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर खासगी दूरसंचार कंपन्यांनी देशात २९ हजार नवे मोबाईल मनोरे (टॉवर) उभारले आहेत, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी लोकसभेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर कॉल ड्रॉपची समस्या न सुटल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा टेलिकॉम कंपन्यांना कॉल ड्रॉपबाबत कडक इशारा देण्यात आला होता, असे प्रसाद म्हणाले. आमच्या स्पष्ट सूचनेनंतर खासगी टेलिकॉम कंपन्यांनी देशभरात २९ हजार नवे मोबाईल मनोरे उभारले असून त्यातील २,२०० एकट्या नवी दिल्लीत आहेत. खासगी कंपन्यांखेरीज सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने देशात ४,५०० तर एमटीएनएलने दिल्लीत २८ मोबाईल मनोरे उभारले आहेत, असे प्रसाद यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायद्याच्या कलम २९ नुसार ट्रायला त्याच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यास दंड ठोठावण्याचे अधिकार आहेत. ट्रायच्या निर्देशांचे पहिल्यांदा उल्लंघन झाल्यास एक लाखापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दंडाची रक्कम दोन लाख होते. त्यानंतरही उल्लंघन सुरूच राहिल्यास जोपर्यंत ते सुरू आहे तोपर्यंत दररोज दोन लाख रुपये एवढा दंड आकारला जाऊ शकतो, असेही ते म्हणाले.