Join us

वाहन उद्योगाच्या रडण्याकडे लक्ष देऊ नये : एन. श्रीनिवासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 01:36 IST

सिमेंटवरही २८ टक्के कर : आम्ही नाही केली कमी करण्याची मागणी

चेन्नई : देशातील वाहन उद्योगाला सतत रडून आपले लक्ष वेधून घेण्याची सवय लागली आहे. या उद्योगाची जीएसटी कमी करण्याची मागणी मान्य करण्याचे कारण नाही. जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणूनही वाहनांची मागणी वाढली नाही, तर काय करणार, असा सवाल करीत, इंडिया सिमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी वाहन उद्योगाने नीट नियोजन न केल्यानेच त्यास मंदीचा परिणाम जाणवत आहे, असे प्रतिपादन केले आहे.

वाहनांवरील जीएसटी कमी करावा, तो अधिक असल्याने वाहन खरेदी खूप कमी झाली आहे, असे त्या क्षेत्राचे म्हणणे आहे. वाहन उद्योगातील सर्वच कंपन्या अडचणीत आल्या असून, त्यामुळे काहींनी काही दिवस उत्पादन बंद ठेवणे सुरू केले आहे, तर काहींनी हंगामी व कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. वाहन उद्योगाशी पूरक क्षेत्रातील कामगारांच्या रोजगारावरही गदा आली आहे. मात्र, वाहनांवरील जीएसटी कमी करण्याचे कारण नाही, अशी स्पष्ट भूमिका एन. श्रीनिवास यांनी घेतली आहे. जीएसटी कौन्सिलची बैठक २0 सप्टेंबर रोजी होणार असून, त्याकडे वाहन उद्योगाचे लक्ष लागले आहे.

ते म्हणाले की, सध्या अनेक उद्योगांना मंदी जाणवत आहे. जीएसटीचा दर कमी करून तो प्रश्न सुटेल, याची खात्री नाही. वाहनांवरील जीएसटी १८ टक्क्यांवर आणूनही मागणी वाढली नाही, तर काय करणार? याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे रडून कर कमी करवून घेण्याऐवजी वाहन उद्योगाने स्वत:मध्ये रचनात्मक बदल करणे गरजेचे आहे. कमी किमतीची वाहने त्यांनी बाजारात आणायला हवीत. त्यांना मागणी असू शकेल, पण नवा प्रयोग करण्याकडे वाहन उद्योगाचे लक्षच नाही.

सिमेंटवरही २८ टक्के जीएसटी आहे, पण आम्ही तो कमी करावा, यासाठी रडलो नाही. इतरांना माहिती नसेल, पण सिमेंट उद्योगाने आपली क्षमता ८0 टक्क्यांपर्यंत खाली आणली आहे. आम्हीही प्रसंगी एक दिवसाआड उत्पादन करीत आहोत, पण कधीही जीएसटी कमी करा, अशी मागणी आम्ही केलेली नाही.

वाहन उद्योगांवर तुटून पडताना श्रीनिवासन म्हणाले की, प्रत्येक उद्योगावर अधूनमधून अशी वेळ येतच असते. ज्यावेळी वाहनांना प्रचंड मागणी होती आणि जोरात उत्पादन सुरू होते, या उद्योगांना नफा मिळत होता, तेव्हा ही मंडळी गप्प होती. आताही मारुती सुझुकीचा तिमाही नफा १,४00 कोटी रुपये आहे आणि पैशांच्या राशीवर कंपनी बसून आहे. 

उत्पादन वाढल्याचा परिणाम : राजीव बजाजया आधी बजाज आॅटोचे राजीव बजाज यांनीही वाहनांचे उत्पादन फारच वाढल्याने आजची स्थिती उद्भवली असल्याचे प्रतिपादन केले होते. जीएसटीचा दर कमी करण्याचे कारण नाही, असे नमूद करतानाच मंदी आणि वाहनांची कंपन्यांनी करून ठेवलेली साठेबाजी हे आजच्या समस्येचे कारण आहे, असे राजीव बजाज यांनी बोलून दाखविले होते. कोणताच उद्योग सतत वाढत राहू शकत नाही, तो वाढत राहण्यासाठी त्यात बदल, दुरुस्त्या कराव्याच लागतात, असे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्था