पुणे : सभासद, खातेदार, ठेवीदारांना बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती व्हावी यासाठी त्याच्या तपशिलाचा फलक सर्व शाखांमध्ये दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. काही नागरी बँका केवळ मुख्यालयातच असा तपशील लावतात. त्या पार्श्वभूमीवर लेखापरीक्षण करताना या मुद्द्याची नोंद घेण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले असल्याची माहिती प्रभारी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर यांनी दिली. अलीकडच्या काळात काही सहकारी बँकांवर आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. तसेच काही बँकांमध्ये बेनामी व्यवहार होत असल्याचे देखील उघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने या आदेशाचे परिपत्रक काढले आहे. नागरी सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत सभासद, ठेवीदार व खातेदारांना तपशीलवार माहिती मिळणे आवश्यक आहे. मात्र काही बँका केवळ मुख्यालयातच त्याची माहिती लावतात. मात्र सर्व शाखांमध्ये बँकेच्या आर्थिक स्थितीचा तपशील दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. तशी माहिती बँकानी लावावी असे पत्र सहकार विभागाने नागरी सहकारी बँक फेडरेशनला देखील पाठविले आहे. तसेच त्याबाबत सहकारी सह निबंधक व उपनिबंधकांना देखील सुचना देण्यात आल्या आहेत. लेखापरीक्षकांना बँकाचे लेखापरीक्षण करताना बँकेच्या सर्वशाखांमध्ये अशी नोंद केली जाते की नाही याची तपासणी करुन त्याबाबतचा शेरा लेखापरीक्षण अहवालात द्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
नागरी बँकांचा आर्थिक तपशील फलकाचे होणार आॅडिट
By admin | Updated: June 16, 2014 04:16 IST