Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ रत्ने, वस्त्रप्रावरणांचा लिलाव

By admin | Updated: October 18, 2016 06:33 IST

जुन्या काळातील दुर्मीळ रत्ने आणि वस्त्रप्रावरणांचा सॅफ्रनआर्ट या संस्थेच्या वतीने १८ ते २0 आॅक्टोबर दरम्यान आॅनलाइन लिलाव होणार आहे.

नवी दिल्ली : जुन्या काळातील दुर्मीळ रत्ने आणि वस्त्रप्रावरणांचा सॅफ्रनआर्ट या संस्थेच्या वतीने १८ ते २0 आॅक्टोबर दरम्यान आॅनलाइन लिलाव होणार आहे. इतरही अनेक दुर्मीळ वस्तूंचा त्यात समावेश आहे. जुन्या पद्धतीने कट केलेले हिरे, मोगलकालीन मीनाकारी आणि ठेवा पद्धतीने बनविलेले दागिने, अभिजात रत्नहार, सोन्याच्या सिगारेट डब्या आणि होल्डर, गोळ्यांच्या डब्या, अत्तरदाण्या, आकर्षक रंगांचे दगड आदी असंख्य प्रकारच्या वस्तू या लिलावात ठेवल्या गेल्या आहेत. तीन सरींचा मोत्यांचा एक दुर्मीळ हार यात आहे. यातील मोती अचूक समान आकाराचे आहेत. त्याची किंमत २.८ कोटी ते ३.२ कोटी इतकी ठेवण्यात आली आहे. याशिवाय म्यानमारमधील खाणींत मिळालेले दुर्मीळ नील आणि माणिक, नैसर्गिक खाऱ्या पाण्यातील मोती, नील आणि हिऱ्यांची कर्णभूषणे, गुलाबी नील रत्ने, हिऱ्यांची कर्णभूषणे अशा अनेक प्रकारच्या वस्तू त्यात आहेत. सॅफ्रनआर्टच्या सहसंस्थापक मीनल बाझिरानी यांनी सांगितले की, लिलावात ठेवण्यात आलेल्या वस्तूंच्या किमती आकर्षक ठेवण्यात आल्या आहेत. यातील अंगठ्या, गळ्यातील पदके आणि कर्णभूषणे नेहमी वापरता येतील, अशा प्रकारचे आहेत. लिलावातील ऐतिहासिक वस्त्रप्रावरणांचे दालनही असेच समृद्ध आहे. वस्त्र इतिहासकार जसलीन धामिजा यांनी सहा दशकांपेक्षा जास्त काळ जमविलेले कपडे त्यात आहेत. ८३ वर्षीय धामिजा म्हणाले, हा ठेवा काळजीपूर्वक जतन करून ठेवील, अशा व्यक्तीने माझ्या संग्रहातील वस्त्रप्रावरणे खरेदी करावीत, अशी इच्छा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कपड्यांवर संशोधनकाश्मिरी पश्मिना, मध्य आशियातील सुझेनी, इराणमधील किलिम आणि पारशी सोफ्रे ही त्यातली काही दुर्मीळ उदाहरणे होत. यातील प्रत्येक कपड्याची आपली स्वतंत्र तंत्रशैली, डिझाइन, रंग आणि अर्थ आहे. धामिजा यांनी कपड्यांवर संशोधन करताना भारतासह, इराण, मध्य आशिया, आग्नेय आशिया, बाल्कन आणि आफ्रिका या भागात प्रवास करून हा ठेवा मिळविला आहे.