नवी दिल्ली : सरकारने गुंतवणूकदारांना विविध परवानग्या घ्याव्या लागण्याची पद्धत बदलण्यासाठी नागरिकांना उपाय सुचविण्याचे आवाहन केले असून देशातील व्यवसायाला सुलभ बनविणे हा यामागचा उद्देश आहे. औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाने (डीआयपीपी) याबाबत यापूर्वीच अकरा सदस्यांची तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागण्याची पद्धत बदलण्याच्या शक्यतेवर विचार करून मसुदा अहवाल तयार करेल. डीआयपीपीचे माजी सचिव अजय शंकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत, तर समिती सदस्यांमध्ये एअरटेलचे उपाध्यक्ष मनोज कोहली तसेच सल्लागार कंपनी केपीएमजीचे जयजीत भट्टाचार्य यांचा समावेश आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक परवानग्यांची पद्धत बदलण्याबाबत लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यामुळे गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत मिळणार आहे, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अनेक परवानग्यांची पद्धत बदलण्याचे केंद्राचे प्रयत्न
By admin | Updated: May 8, 2015 00:58 IST