Join us
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये मिळणार आता १०, २०, ५० रुपयांच्या नोटा!

By admin | Updated: May 22, 2014 02:21 IST

ग्राहकांच्या सोयीसाठी १० , २० आणि ५० रुपयांच्या नोटाही एटीएम मशीनमध्ये ठेवण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिले

मुंबई : ग्राहकांच्या सोयीसाठी १० , २० आणि ५० रुपयांच्या नोटाही एटीएम मशीनमध्ये ठेवण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिले असून, याची सुरुवात रायपूर येथून झाली आहे. एटीएममशीनमधून हवे ते पैसे काढण्याची मुभा ग्राहकांना मिळत असली तरी, अनेकवेळा त्या मशीनमधून केवळ १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटाच उपलब्ध असल्याने ग्राहकांची गैरसोय होते. या अनुषंगाने ग्राहकांच्या अनेक तक्रारी शिखर बँकेला प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आॅगस्ट २०१३ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना चलनात उपलब्ध असलेल्या सर्व नोटा एटीएममधून उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, बँकांनी त्याची फारशी दखल घेतली नव्हती. मात्र, ग्राहकांच्या तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने आता हे आदेश काढत बँकांना तशी सक्ती केली आहे. रायपूर येथीलस स्टेट बँकेच्या शाखेने याची सुरुवात केली असून बँक आॅफ महाराष्ट्रने देखील याच्या अंमलबजावणीची तयारी दर्शविली आहे. याचसोबत, बँकेने आपल्या ग्राहकांना नाणी देण्यास नकार देऊ नये, अशी तंबीही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. याकरिता सुट्या पैशांची (नाण्यांची) मशिनच उपलब्ध करून देण्याचा विचार बँका करत आहेत. (प्रतिनिधी)