Join us  

अशोक लेलँडचे उत्पादन १५ ऑक्टोबरपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 7:39 AM

आर्थिक मंदीचा फटका हिंदुजा उद्योगसमूहातील अशोक लेलँडलाही बसला आहे. सप्टेंबरमध्ये अशोक लेलँडची केवळ ८,७८० वाहने विकली गेली.

चेन्नई : आर्थिक मंदीचा फटका हिंदुजा उद्योगसमूहातील अशोक लेलँडलाही बसला आहे. सप्टेंबरमध्ये अशोक लेलँडची केवळ ८,७८० वाहने विकली गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीची १९ हजार ३७४ वाहने विकली गेली होती. म्हणजेच यंदा विक्रीत ५५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे अशोक लेलँडने १५ आॅक्टोबरपर्यंत उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.ही कंपनी प्रामुख्याने ट्रक व बसेस बनवते. कंपनीच्या मध्यम व अवजड श्रेणीतील ४,७४४ वाहनांची यंदा विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ६७ टक्क्यांनी घटले आहे. हलक्या वजनाच्या ४,०३६ वाहनांची यंदा विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशोक लेलँडच्या विविध प्रकल्पांमध्ये वाहनांचे उत्पादन २ आॅक्टोबरपासून १५ आॅक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.आर्थिक मंदीचा फटका वाहननिर्मिती उद्योगाला बसला आहे. वाहनांची विक्री झपाट्याने कमी झाली आहे. कामगारांचे रोजगार धोक्यात आले आहेत. मारुती सुझुकी, ह्युंदाई, होंडा, टाटा मोटर्स अशा कार्स बनविणाऱ्या कंपन्यांच्या कार्सच्या विक्रीतही मोठी घट झाली आहे. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :व्यवसाय