Join us  

लोक 2000 च्या नोटा बदलून घेतायत की जमा करतायत? SBI नं स्पष्टच सांगितलं, सत्य जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 2:13 PM

2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भातील घोषणेबरोबरच, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येतील अथवा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

 

नवी दिल्‍ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने 2,000 रुपयांची नोट चलनातून बाहेर केली आहे. यानंतर, 23 मेपासून देशभरातील बँकांमध्ये  2000 रुपयांच्या नोटा जमा होत आहेत आणि बदलल्याही जात आहेत. मात्र, लोक 2,000 रुपयांची नोट बदलण्यापेक्षा आपल्या बँक खात्यात जमा करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) एका आठवड्यातच 14,000 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. तसेच, या तुलनेत लोकांनी बँकेतून केवळ 3,000 कोटी रुपयांच्या नोटाच बदलल्या आहेत. यावरून, लोकांचे प्राधान्य नोटा बदलण्यापेक्षाही जमा करण्याला अधिक असल्याचे स्पष्ट होते.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार एसबीआयचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांनी ही माहिती दिली. गांधीनगर येथे एसबीआय फॉरेन करन्सी बॉड लिस्टिंग समारोहानंतर खारा म्हणाले, “जवळपास 14,000 कोटी रुपये किंमतीच्या 2,000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा झाल्या आहेत. तसेच, बँक ब्रांचसमधून 3,000 कोटी रुपये मूल्‍याच्या 2,000 रुपयांच्या नोटा बदलल्या गेल्या आहेत.” खरे तर, अद्याप इतर कुठल्याही बँकेने जमा केलेल्या आणि बदललेल्या नोटांची आकडेवारी जाहीर केलेली नाही. मात्र, देशातील सर्वात मोठ्या बँकेने जारी केलेल्या या आकडेवारीवरून लोकांचा कल नोटा जमा करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येते.

30 सप्टेंबरपर्यंत बदलू शकता नोटा - 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भातील घोषणेबरोबरच, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येतील अथवा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. 23 मे पासून नोटा बदलून घेण्यास अथवा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. 2000 रुपयांची नोट कोणत्याही बँकेच्या शाखेत बदलता येते. महत्वाचे म्हणजे, एका वेळी केवळ 10 नोटाच बदलल्या जाऊ शकतात. तसेच, बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. 

2016 मध्ये चलनात आली होती ही नोट -2016 मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर 2,000 रुपयांची ही नोट चलनात आली होती. नरेंद्र मोदी सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बाद केल्यानंतर चलनाची कमतरता भासू नये, यासाठी 2,000 रुपयांची नोट बाजारात आणण्यात आली होती.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँकनोटाबंदी