Join us  

१ एप्रिलपासून मिळणार 'पर्यावरणस्नेही' जगातील सर्वोत्तम इंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:32 AM

‘युरो-४’ऐवजी ‘युरो-६’ दर्जाचे पेट्रोल, डिझेल

नवी दिल्ली : वाहनांच्या इंधनाच्या बाबतीत येत्या १ एप्रिलपासून भारत ‘युरो-४’ दर्जावरून ‘युरो-६’ दर्जावर झेप घेणार असून त्या दिवसापासून पेट्रोल पंपांवर सर्वात कमी गंधकाचे पेट्रोल व डिझेलच विकले जाईल.

‘युरो-४’ ते ‘युरो-६’ हा पल्ला भारत तीन वर्षांत गाठणार आहे. मोठी अर्थव्यवस्था असलेल्या कोणत्याही देशाला एवढ्या अल्पावधीत हे स्थित्यंतर जमले नाही. वाहनांसाठी फक्त ‘युरो-६’ इंधन वापरणाऱ्या मोजक्याच देशांत भारत स्थान मिळवेल. ‘यूरो-६’ दर्जाच्या इंधनात गंधकाचे प्रमाण केवळ १० लाखांत १० भाग असते. असे इंधन पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात स्वच्छ इंधन मानले जाते. यामुळे वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण निचांकी पातळीवर राहते. हिवाळ््यात, वाहनांच्या धुरामुळे हवा धुरकट होऊन श्वास कोंडणे ही मोठी समस्या आहे. इंडियन आॅइलचे अध्यक्ष संजीव सिंग यांनी ‘युरो-६’साठी ठरलेले १ एप्रिलचे उद्दिष्ट नक्की गाठले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, सर्व तेल शुद्धिकरण कारखान्यांमध्ये ‘युरो-६’ दर्जाच्या पेट्रोल व डिझेलचे उत्पादन गेल्या वर्षीच पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहे. हे सर्वोत्तम इंधन डेपोंमध्ये पोहोचविले आहे. तेथून ते पेट्रोल पंपांपर्यंत जाईल व ठरल्या तारखेपासून पंपांवर हेच इंधन मिळेल. ते म्हणाले की, ‘युरो-५’चा टप्पा गाळून ‘युरो-६’वर उडी घेण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेण्यात आला. ‘युरो-५’चा टप्पा घेतला असता तर ‘युरो-६’चा पल्ला चार-सहा वर्षांनी लांबला असता.पर्यावरणस्नेही दर्जाभारताने वाहनांच्या इंधनासाठी उत्तरोत्तर उन्नत तंत्रज्ञान व पर्यावरणस्नेही दर्जा स्वीकारण्यास १९९०च्या दशकापासून सुरुवात केली. त्यामुळेच ३० वर्षांत रस्त्यांवर धावणाºया वाहनांची संख्या शतपटीने वाढूनही हवेचे प्रदूषण त्या प्रमाणात वाढू न देणे शक्य झाले आहे.

टॅग्स :व्यवसाय