मुंबई : अनिवासी भारतीयांना भारतात राहणार्या नातेवाइकांना आता पैसे पाठविणे महाग झाले आहे. कारण सेवाकर विभागाने या पैशांवर सेवाकर लागू करण्याचा निर्णय एका पत्रकाद्वारे जाहीर केला असून, १२.३६ टक्के इतकी कर आकारणी होणार आहे.
केंद्रीय अबकारी व सीमा शुल्क मंडळाने मंगळवारी या संदर्भात एका पत्रकाद्वारे हे निर्देश जारी केले आहेत. यानुसार अनिवासी भारतीयांतर्फे जे पैसे भारतात पाठविले जातील, ते ज्या बँकेतर्फे अथवा वित्तीय संस्थेतर्फे पाठवतील, त्यांनी तेवढय़ा मूल्याच्या रकमेवर सेवाकर भरणे अनिवार्य आहे. सरकारने महसूल वाढीकरिता अनिवासी भारतीयांच्या खिशात हात घातला असला तरी याबाबत वित्तीय संस्थांनी टीकास्त्र सोडले आहे. मुळात अनिवासी भारतीय जी रक्कम जमा करतात ती परकीय चलनात असल्याने देशाला परकीय चलन तर मिळेल; पण या निर्णयामुळे हे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून, पुन्हा हवालामार्गे व्यवहार करण्याचे प्रमाण वाढू शकेल. त्यामुळे अशा निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)