Join us  

नववर्षात बसणार महागाईचा झटका! कारपासून खाद्यतेलापर्यंत सर्वांच्या किमती वधारणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:47 PM

२०२१ वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण आता प्रवेश केला आहे आणि ख्रिसमस, थर्टीफर्स्टच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पण नववर्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी महागाईचा झटका देणारं ठरणार आहे.

नवी दिल्ली-

२०२१ वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात आपण आता प्रवेश केला आहे आणि ख्रिसमस, थर्टीफर्स्टच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. पण नववर्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी महागाईचा झटका देणारं ठरणार आहे. नव्या वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. २०२२ मध्ये उत्पादन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं या कंपन्यांनी याआधीच २०२१ वर्षात दोन ते तीन वेळा उत्पादनांच्या किमतीत वाढ केली होती. कोरोनामुळे पुरवठा साखळीवर खूप मोठा परिणाम झाला आहे. याचा परिणाम उत्पादनांच्या किमतीवरही दिसून येत आहे. 

पुढील तीन महिन्यांमध्ये उत्पादनांच्या किमतीत ४ ते १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता FMCG कंपन्यांनी व्यक्त केली आहे. डिसेंबर महिन्यात इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी उत्पादनांच्या किमतीत ३ ते ५ टक्क्यांची वाढ केली आहे. या महिन्यात फ्रीज, वॉशिंग मशीन, एसीच्या किमती वाढल्या आहेत. येत्या महिन्याभरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत १० टक्के वाढ होणार आहे. 

ऑटो कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दरवाढऑटो सेक्टरमध्ये महागाईची लाटच आली आहे. या वर्षात ऑटो कंपन्यांकडून उत्पादनांमध्ये बरीच दरवाढ केलेली पाहायला मिळाली आहे. हाच ट्रेंड नववर्षातही पाहायला मिळणार आहे. मारुती सुझूकी, टाटा मोटर्स, हुंडाई, महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, वोक्सवॅगनसारख्या कंपन्या याधीच उत्पादनांच्या किमतीत वाढ करुन झाले आहेत. मारुती आणि हिरो मोटोकॉर्प कंपनीनं २०२२ या वर्षात देखील दरवाढ करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

१२ टक्क्यांपर्यंत दरवाढFMCG कंपन्यांबाबत बोलयाचं झालं तर गेल्या दोन तिमाहीत हिंदुस्थान युनीलिव्हर, डाबर, ब्रिटानिया, मॅरिकोसारख्या कंपन्यांनी आपत्या उत्पादनांच्या किमतीत ५ ते १२ टक्क्यांची वाढ केली आहे. नववर्षात पहिल्या तिमाहीपर्यंत ५ ते १० टक्क्यांची आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर आम्हाला याआधीच कंपनीच्या उत्पादनावर ४ टक्क्यांची दरवाढ करावी लागली आहे, असं डाबर कंपनीचे सीईओ मोहित मल्होत्रा यांनी सांगितलं. येत्या काळात महागाईचा दर स्थिर राहिला तर किमती कमी करण्याच विचार केला जाऊ शकेल, पण सध्या तसं काही चित्र दिसून येत नाही, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :महागाईनववर्ष