Join us

आणखी ५ हजार टन तूरडाळ आयात होणार

By admin | Updated: September 12, 2015 03:38 IST

देशात डाळीचा भाव किलोला १५५ रुपयांवर जाताच सरकारने या महागाईला रोखण्यासाठी तुरीची ५ हजार टन अतिरिक्त डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : देशात डाळीचा भाव किलोला १५५ रुपयांवर जाताच सरकारने या महागाईला रोखण्यासाठी तुरीची ५ हजार टन अतिरिक्त डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला. या आयातीमुळे स्थानिक बाजारात डाळीची उपलब्धता वाढेल व वाढत्या भावावर नियंत्रणही राहील.ही आयात खनिज आणि धातू व्यापार महामंडळामार्फत केली जाईल. या महामंडळाने याआधी १० हजार टन डाळीच्या आयातीसाठी जी निविदा दिली होती ती प्रक्रिया अधिक गतिमान करण्यास त्याला सांगण्यात आले आहे. आणखी पाच हजार टन डाळीच्या आयातीसाठी महामंडळ जागतिक पातळीवर निविदा मागवील, असे ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव सी. विश्वनाथन यांनी सांगितले. महामंडळाला तूर आणि उडदाच्या १० हजार टन डाळीच्या आयातीला वेग द्यावा, असे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारांना डाळींच्या किरकोळ विक्रीसाठी वितरण व्यवस्था तयार करण्यासही सांगण्यात आले आहे.आयात झालेल्या डाळीचे किरकोळ वितरण करण्यासाठी राज्य सरकारांनी मदर डेअरीच्या संपर्कामध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.