Join us

आयुर्वेदासाठी अमेरिकेची साथ

By admin | Updated: June 6, 2017 04:32 IST

आयुर्वेद या उपचार पद्धतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी भारत व अमेरिका यांच्यात लवकरच सामंजस्य करार केला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आयुर्वेद या उपचार पद्धतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी भारत व अमेरिका यांच्यात लवकरच सामंजस्य करार केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे दिली. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या वैद्य अनंत धर्माधिकारी व वैद्य मदन गुलाटी यांना साण्डू आयुर्वेद गौरव, तसेच वैद्य सुविनय दामले, वैद्य चंद्रकांत त्रिपाठी आणि वैद्य मनोज उपाध्याय यांना ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी श्री. नाईक म्हणाले की, आयुर्वेद उपचार पद्धती हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात या शास्त्रास तुच्छ समजण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती, पण नेमक्या याच काळात लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी मंत्राने प्रेरित होऊन १० मे १८९९ रोजी साण्डू ब्रदर्सनी आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये क्रांती आणण्याचे ठरविले. हे त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. या वेळी साण्डूचे शशांक सांडू म्हणाले की, मुंबईत ठाकुरद्वार येथे सुरू झालेली फॅक्टरी नंतर उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे चेंबूर येथे हलविण्यात आली.या वेळी झालेल्या चर्चासत्रांत २१व्या शतकातील आयुर्वेदाची उपयुक्तता व शक्ती या विषयावर महाराष्ट्र सरकारच्या आयुर्वेद विभागाचे संचालक वैद्य कुलदीपराज कोहली यांनी आपले विचार मांडले. बदलती संस्कृती, बदलता आहार या विषयावर वैद्य सुविनय दामले यांनी मार्गदर्शन केले. कॅन्सर व आयुर्वेद यावर वैद्य समीर जमदग्नी यांनी विचार मांडले.