नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१५-२०१६ मध्ये जाहीर केलेल्या सेवाकरातील काही प्रस्तावांची अंमलबजावणी एक एप्रिलपासून सुरू होताच प्राणिसंग्रहालये, संग्रहालये आणि व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेश तिकीट स्वस्त होईल व त्याच वेळी बिझनेस क्लासने विमान प्रवास, म्युच्युअल फंडस् व चिटफंडातील गुंतवणूक महाग होईल.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सेवाकराला तर्कसंगत बनविण्यासाठी गेल्या महिन्यात काही प्रस्ताव मांडले होते. त्यात सेवाकर वाढवून तो १४ टक्के करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. सध्या हा दर १२.३६ टक्के आहे. नवा सेवाकर संसदेने अर्थ विधेयक संमत केल्यानंतर सरकार अधिसूचित करणाऱ्या तारखेपासून लागू होईल. सेवाकराशी जोडले गेलेले अन्य प्रस्ताव एक एप्रिल २०१५ पासून लागू होतील. त्यात प्राणिसंग्रहालये, संग्रहालये, राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्ये आणि व्याघ्र अभयारण्यांशी संबंधित सेवांना देण्यात आलेली सूट समाविष्ट आहे. याच प्रमाणे जीवन विमा योजना, वरिष्ठ पेन्शन विमा योजना, रुग्णवाहिका सेवा, फळे आणि भाज्यांच्या किरकोळ पॅकिंगवरही कोणताही सेवाकर लागू नाही. विमानाच्या किमतीच्या ४० टक्के रकमेवर सध्या सेवाकर असून तो आता ६० टक्के आकारला जाईल. इकॉनॉमी क्लास वगळून इतर वर्गाच्या तिकिटाच्या सेवाकरावरील सूटही कमी केली जात आहे. या नुसार उच्च श्रेणीच्या विमान प्रवास तिकिटाच्या ६० टक्क्यांवर सेवाकर द्यावा लागेल.म्युच्युअल फंड एजंटांद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा लॉटरी तिकिटांची मार्केटिंग, विभागाकडून संचालन होणारी टेलिफोन सेवा, विमानतळ व रुग्णालयांतून होणारे फोन कॉल्स आता सेवाकराला पात्र आहेत. चिटफंडचा सेवाकर भरणे, कमिशन वा या स्वरूपाची अन्य रक्कम प्राप्त करणाऱ्यांचा सेवाकर चिटफंड मुकादमाकडून अदा केला जाईल.
विमान प्रवास, म्युच्युअल फंड गुंतवणूक आजपासून महाग
By admin | Updated: April 1, 2015 01:46 IST