Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अधिकाऱ्याच्या हाती आता एअर इंडियाची धुरा

By admin | Updated: August 21, 2015 00:16 IST

सातत्याने आर्थिक विपन्नावस्थेत असलेल्या एअर इंडिया या भारताच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीची धुरा आता रेल्वे अभियंता सेवेतील अश्वनी लोहाणी

नवी दिल्ली : सातत्याने आर्थिक विपन्नावस्थेत असलेल्या एअर इंडिया या भारताच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीची धुरा आता रेल्वे अभियंता सेवेतील अश्वनी लोहाणी यांच्या हाती सोपविण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.भारतीय प्रशासकीय सेवेचे अघिकारी असलेले एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित नंदन यांची चार वर्षांची कारकीर्द गुरुवारी संपली. त्यांच्याजागी तीन वर्षांसाठी लोहाणी यांची नेमणूक करण्याचा अधिकृत आदेश कार्मिक मंत्रालयाने जारी केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणुकाविषयक समितीने मंजुरी दिल्यानंतर हा आदेश काढला गेला.‘इंडियन रेल्वे सर्व्हिस आॅफ मेकॅनिकल इंजिनिअर्स’ (आयआरएसएमई) या सेवेचे १९८० च्या तुकडीतील अधिकारी असलेले लोहाणी सध्या भोेपाळ येथे मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. रेल्वेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक हुद्यापर्यंत गेलेल्या लोहाणी यांनी गेली १२ वर्षे प्रामुख्याने पर्यटन आणि हॉटेल व पाहुणचार उद्योगात काम केले. भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे (आयटीडीसी) अध्यक्ष या नात्याने दिल्लीतील तोट्यातील अशोका हॉटेल नफ्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)