Join us

कृषी विद्यापीठाचा जैविक कीड नियंत्रणावर भर!

By admin | Updated: January 26, 2016 02:29 IST

पर्यावरण प्रदूषण कमी करण्याकरिता, विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करुन शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने

अकोला : पर्यावरण प्रदूषण कमी करण्याकरिता, विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करुन शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्या वतीने जैविक कीड नियंत्रण घटक उत्पादन वाढीवर भर देण्यात येत असून, या घटकाच्या उत्पादन वाढीसाठी विदर्भातील शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे.खरीप, रब्बी पिकांवर अनेक नवीन किडींचा प्रादुर्भाव अलीकडे वाढला असून, यातील घाटेअळी विषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक व क्रायसोपा व ढाल या परभक्षी जैविक घटकांचे उत्पादन व हे जैविक कीड नियंत्रक वापरण्यासंबधी अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुरुवारपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असूून, तीन-तीन शेतकरी गटांना हे प्रशिक्षण २ फेब्रुवारीपर्यंत दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचे वैयक्तिक लक्ष असून, ते स्व:त उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.विदर्भातील तूर, कापूस, हरभरा, सोयाबीन व भाजीपाला पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने घाटे अळीविषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक तसेच क्रायसोपा या परभक्ष्यी कीटकांची प्रयोगशाळेत निर्मिती व त्यांचा पिकामध्ये वापर व इतर इत्थंभूत माहिती प्रत्यक्ष उत्पादन तंत्राच्या अनुभवातून शेतकऱ्यांना या प्रशिक्षणात देण्यात येत आहे. किडींची अंडी व सुरुवातीच्या अळी अवस्थेतच किडींचा समूळ नायनाट करण्याकरिता व दीर्घकाळ प्रभावी अशा जैविक घटकांच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे, सरळ व कमी खर्चाचे असल्याचे शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाद्धारे अनुभवास येत आहे. विभागीय कृषी सहसंचालक अमरावती व जिल्हा आत्मा संस्थेच्या सहयोगाने हे मोफत प्रशिक्षण डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात देण्यात येत आहे.