Join us

कृषी विद्यापीठ रोजंदारी मजुरांचा प्रश्न निकाली

By admin | Updated: December 9, 2015 23:31 IST

राज्यातील कृषी विद्यापीठात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ मजूर रोजंदारीवर काम करीत होते. या मजुरांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती

शिवाजी गोरे,  दापोलीराज्यातील कृषी विद्यापीठात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ मजूर रोजंदारीवर काम करीत होते. या मजुरांना कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे सुरू होती. ही मागणी आता पूर्ण झाली असून, दापोली कृषी विद्यापीठातील १०४ मजुरांना सामावून घेण्यात आले आहे.या कामगारांच्या लढ्याला ‘लोकमत’ने साथ दिली होती. राज्यातील तीन कृषी विद्यापीठांत ११५९ रोजंदारी मजुरांना कायम करण्यात यावे, अशी मागणी मजूर संघटनांनी केली होती. विधानपरिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी या मजुरांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन १९ मार्च २०१५ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले होते.या आश्वासनाची पूर्तता झाली असून, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठांतर्गत ११५९ मजुरांना कायमस्वरुपी सामावून घेण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सामावून घेणे सुुरू झाले असून, दापोली कोकण कृषी विद्यापीठातील १०४ रोजंदार मजुरांना कामावर सामावून घेण्यात आले आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठातील ३२५ रोजंदारी मजुरांना विद्यापीठाच्या सेवेत सामावून घ्यायचे आहे. दापोली विद्यापीठासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या कृषी विद्यापीठातील ११५९ रोजंदारी मजुरांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचे तीनही विद्यापीठांना आदेश देण्यात आले.