Join us  

Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:30 PM

Gautam Adani Investment : पाहा काय आहे गौतम अदानींचा प्लॅन. करण अदानी यांनी नुकतीच घेतली फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांची भेट.

Gautam Adani Investment : भारत आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह आता फिलिपिन्समध्ये (Philippines) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. अदानी समूहाच्या कंपन्या देशातील बंदरं, विमानतळं, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत. समूहातील कंपनी अदानी पोर्ट्सनं फिलिपिन्समधील बटान येथे २५ मीटर खोल बंदर विकसित करण्यात स्वारस्य दाखवलं आहे.  

हे बंदर पॅनामॅक्स वेसल्सदेखील हाताळू शकतं. साधारणपणे या प्रकारच्या जहाजाचं वजन ५०,००० ते ८०,००० डेडवेट टन असतं. हे ९६५ फूट लांब, १०६ फूट बीम आणि ३९.५ फूट ड्राफ्ट जहाज आहे. यात मोठ्या प्रमाणात माल वाहून नेला जाऊ शकतो. अशी अवजड जहाजं हाताळण्याची सोय जगातील फार कमी बंदरांवर आहे. 

फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट 

गौतम अदानी यांचा मुलगा आणि अदानी पोर्ट्सचे एमडी करण अदानी यांनी गुरुवारी फिलिपिन्सचे  राष्ट्राध्यक्ष फर्निदाद आर मार्कोस ज्युनिअर यांची मनिला येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी फिलिपिन्समधील अदानी समूहाच्या गुंतवणुकीच्या योजनांची माहिती दिली. मार्कोस यांनी अदानी पोर्ट्सच्या योजनेचं स्वागत केलं. 

 

फिलिपिन्स आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकेल यासाठी कंपनीनं कृषी उत्पादनं हाताळण्यावर लक्ष केंद्रित करावं, असं त्यांनी सुचवलं. त्यांचं सरकार देशातील पर्यटकांसाठी गेटवे विकसित करत आहे. त्याचबरोबर शेतीसंबंधीत उत्पादनांची लॉजिस्टिक कॉस्ट स्वस्त व्हावी यासाठी गेटवे तयार केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. अदानी पोर्ट्सचा करार अंतिम झाला तर कंपनीची चौथ्या देशात एन्ट्री होईल. यापूर्वी कंपनीनं श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. 

कंपनीचा नफा वाढला 

अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडनं (एपीएसईझेड) चौथ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ७६.८७ टक्क्यांनी वाढून २,०१४.७७ कोटी रुपये झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स कंपनीनं गेल्या वर्षी याच कालावधीत १,१३९.०७ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. 

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय