Join us  

उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या धमकीचे मुंबई शेअर बाजारात पडसाद, शेअर बाजार 400 अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 5:07 PM

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अणवस्त्राची चाचणी करण्याचा इशारा दिल्यानंतर लगेचच त्याचे मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटले.

ठळक मुद्दे'जर तुम्ही आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू', शुक्रवारी व्यवहाराच्या अखेर दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक 400 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला.

मुंबई, दि. 22 - उत्तर कोरियाने पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बची चाचणी करण्याचा इशारा दिल्यानंतर लगेचच त्याचे मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद उमटले. शुक्रवारी व्यवहाराच्या अखेर दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक 400 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. उत्तर कोरियाने प्रशांत महासागर अणवस्त्राचा स्फोट घडवण्याचा इशारा दिला आहे. बीएसई सेन्सेक्स 447 अंकांनी कोसळून 31,922 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीवरही या घसरणीचा परिणाम झाला. निफ्टी 157 अंकांनी कोसळून 9,964 अंकांवर बंद झाला. 

उत्तर कोरियाने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. 'जर तुम्ही आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू', अशी धमकी उत्तर कोरियाने अमेरिकेला दिली आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री याँग हो यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकीची किंमत चुकवावी लागेल असं सांगितल्यानंतर काही वेळानंतर री याँग हो यांनी हे वक्तव्य केलं.

री याँग हो बोलले आहेत की, 'प्रशांत महासागरात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. कशाप्रकारे ही कारवाई करण्यात येईल याचा निर्णय अद्याप झालेला नाही, कारण किम जाँग उन यांच्या आदेशानंतरच कारवाईला सुरुवात होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख उत्तर देण्याचा विचार किम जाँग उन करत आहेत'.  री याँग हो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आले आहेत. 

संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाच्या कापड निर्यातीवर बंदी आणली असून, तेल आयात करण्यावरही मर्यादा आणल्या आहेत. यूएनच्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेला थोडी झळ बसेल. कापड उद्योगात चीन उत्तर कोरियाचा सर्वात मोठा भागीदार आहे. उत्तर कोरियातूननिर्यात चीनला  80 टक्के कापड निर्यात होते. अमेरिकेतीलही काही कापड उद्योजक उत्तर कोरियावर अवलंबून आहेत.