Join us  

कोरोनानंतर देशात प्रथमच एप्रिलमध्ये मिळाल्या ८८ लाख नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 9:28 AM

कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर प्रथमच एप्रिल महिन्यात देशात ८८ लाख बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या सुरुवातीनंतर प्रथमच एप्रिल महिन्यात देशात ८८ लाख बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)च्या अहवालानुसार, नोकऱ्या मिळाल्या असल्या तरी मागणीच्या तुलनेत उपलब्ध नोकऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.सीएमआयईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ महेश व्यास म्हणाले, भारतातील कामगार संख्या एप्रिलमध्ये ८.८ दशलक्ष (८८ लाख) ने वाढून ४३७.२ दशलक्ष (४३.७२ कोटी) झाली आहे, ही महामारी सुरू झाल्यापासूनची सर्वात मोठी मासिक वाढ ठरली आहे. 

अहवालात म्हटले आहे की, ८८ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे, याचा अर्थ त्यापैकी बहुतेक लोक असे आहेत जे काही कारणास्तव नोकरीपासून दूर होते आणि आता ते कामावर पुन्हा परतले आहेत. कारण कामाच्या वयाची लोकसंख्या दरमहा २० लाखांपेक्षा जास्त वाढू शकत नाही. जी जास्त वाढ दिसत आहे ती लोक पुन्हा नोकरीवर परतलेल्या कामगारांमुळे दिसत आहे.

ॲमेझॉनने दिले १२ लाख रोजगार

ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन इंडियाने रविवारी सांगितले की, तिने आतापर्यंत निर्यातीमध्ये जवळपास ५ अब्ज डॉलरचे योगदान दिले असून, देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ११.६ लाख लोकांना रोजगार दिला आहे. याशिवाय, अमेरिकन कंपनीने सांगितले की त्यांनी देशातील ४० लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) डिजीटल केले आहेत.

३ महिन्यांपासून सुरू होती घसरण

गेल्या तीन महिन्यांत १.२० कोटी तरुणांच्या नोकऱ्या गेल्यानंतर एप्रिलमध्ये ८८ लाख नोकऱ्यांची वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये रोजगारात वाढ उद्योग आणि सेवा क्षेत्रातील आहे. उद्योग क्षेत्रात ५५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, तर सेवा क्षेत्रात ६७ लाख नोकऱ्यांची भर पडली. या काळात कृषी क्षेत्रातील रोजगार ५२ लाखांनी कमी झाले आहेत.

८८ लाखांनी वाढली कामगारांची संख्या, ४३.७२ कोटी एकूण कामगारांची संख्या, ५५ लाख रोजगार उद्योग क्षेत्रात, ६७ लाख रोजगार सेवा क्षेत्रात, ५२ लाखांनी कमी कृषी क्षेत्रातील रोजगार 

बेरोजगारीचा दर

जानेवारी ६.५७%फेब्रुवारी ८.१०%मार्च ७.६०%एप्रिल ७.८३% 

टॅग्स :नोकरीकोरोना वायरस बातम्या