Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनचे सीईओ काही तासांसाठी सर्वाधिक श्रीमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:21 IST

ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’चे सीईओ जेफ बेझोस हे काही तासांसाठी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले. त्यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळल्यामुळे त्यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील ‘औटघटकेचा राजा’ होण्याचे भाग्य लाभले

न्यूयॉर्क : ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’चे सीईओ जेफ बेझोस हे काही तासांसाठी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले. त्यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळल्यामुळे त्यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील ‘औटघटकेचा राजा’ होण्याचे भाग्य लाभले.‘फोर्ब्स’ नियतकालिकाने ही माहिती जारी केली आहे. फोर्ब्सने म्हटले की, गुरुवारी जेफ बेझोस यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील हा औटघटकेचा राजमुकुट मिळाला. अ‍ॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या एका समभागाची किंमत १,0८३.३१ डॉलर झाली.त्यामुळे बेझोस हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचले. मात्र, त्यानंतर अ‍ॅमेझॉनचे समभाग पुन्हा १ टक्क्याने घसरून १,0४६ डॉलरवर आले. त्यामुळे बोझेस हे पुन्हा दुसºया स्थानी जाऊन बिल गेट्स पहिल्या क्रमांकावर आले.अ‍ॅमेझॉनमध्ये बेझोस यांच्या मालकीचे ८0 दशलक्ष समभाग आहेत. एकूण समभागांच्या तुलनेत त्यांच्या समभागांचे प्रमाण १७ टक्के आहे. जेव्हा अ‍ॅमेझॉनचे समभाग तेजाळून सर्वोच्च पातळीवर गेले, तेव्हा बेझोस यांच्याकडील समभागांची किंमत ८७ अब्ज डॉलरवर गेली. एका होल्डिंग कंपनीच्या माध्यमातून ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ची मालकीही बेझोस यांच्याकडेच आहे.फोर्ब्सने म्हटले की, गुरुवारी सकाळी बाजार उघडला तेव्हा बेझोस यांच्या संपत्तीचे मूल्य ९0.६ अब्ज डॉलर होते. त्याचवेळी बिल गेट्स यांच्या संपत्तीचे मूल्य ९0.१ अब्ज डॉलर होते. वास्तविक बिल गेट्स हे सध्याच्या जगातील खरे अव्वल क्रमांकाचे श्रीमंत आहेत. त्यांनी सेवाकार्यासाठी अब्जावधी डॉलर दान दिले आहेत. त्यामुळे त्यांची संपत्ती बरीच कमी झाली आहे.ताज्या प्रगती पुस्तकात अ‍ॅमेझॉनच्या तिमाही नफ्यात ७७ टक्क्यांची घट झाली आहे. अमाप खर्चामुळे कंपनीचा नफा घटला आहे. त्याचा फटका बसून कंपनीचा समभाग घसरल्याचे सूत्रांनी सांगितले. वॉलस्ट्रीटच्या अपेक्षा पूर्ण न करता आल्यामुळे कंपनीला आणखी २ टक्क्यांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.