Join us

आदिवासींना आधार गवताच्या काडीचा

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST

वसंत भोईर

वसंत भोईर
वाडा - तालुक्यातील ग्रामीण भागात आदिवासींना रोजगारासाठी वणवण भटकावे लागत असते. कधी वीटभ˜ी, रेतीबंदर तर कधी शेतीच्या कामांसाठी मुलाबाळांचे शिक्षण वार्‍यावर सोडून स्थलांतराचा पर्याय अनेकांना निवडावा लागतो. त्यातच, भाद्रपद महिना म्हणजे ग्रामीण भागात हलाखीचा असल्याने व याच महिन्यात गौरी-गणपती व नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. मात्र, या दिवसांत सर्व संकटांवर मात करून सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय बुडणार्‍या आदिवासी बांधवांना मोठा आधार देतो.
ग्रामीण भागात शेतजमिनीशिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून विकण्याचा व्यवसाय या काळात वाड्यातील खैरे-आंबिवली, चंद्रपाडा, कांबारा, न्याहाळपाडा, खुपरी, मांडवा, परळी, उज्जैनी, नीळमाळ, ओगदा, सुतकपाडा, गारगाव, आंबेपाडा, भांगरूळ, फणसपाडा, घायपातपाडा या भागांत सुरू असतो. १५ ऑगस्ट ते दसरा या काळात चालणार्‍या या व्यवसायात गवताच्या लहान ४ गुंड्यांची १ धडी याप्रमाणे प्रत्येक धडीस ३ ते ४ रु. गवत कापणार्‍या मजुरास तर जागामालकास ५ रु. मिळतात. दररोज एक मजूर ५० ते ६० धडी गवत कापतो. त्यातून दिवसभरात १५० ते २०० रु. आदिवासी मजुरास मिळतात. याशिवाय, सणाच्या दिवसांत औषधोपचार व आठवडाबाजारासाठी आगाऊ पैसेदेखील गवताची खरेदी करणारे व्यापारी येथील आदिवासींना देऊन अडचणीच्या वेळी मदत करतात आणि आदिवासींना स्थलांतर करण्यापासून रोखतात, अशी माहिती वाडा येथील गवताचे व्यापारी दिलीप पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली.
खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी येथील तबेल्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आला असून त्या अनुषंगाने या भागातील आदिवासींना पोटाची खळगी भरण्यासाठी हा व्यवसाय म्हणजे बुडत्याला गवताच्या काडीचा आधार बनला आहे.

(वार्ताहर)