नवी दिल्ली : फोक्सवॅगन या वाहन कंपनीने उत्सर्जन चाचणीत केलेली फसवणूक हा ‘विचारपूर्वक केलेला गुन्हा’ आहे, असे स्पष्ट करून, भारतातील फोक्सवॅगनची सर्व डिझेल वाहने नियमांचे पालन करीत आहेत की नाही हे पाहण्यासाठी सहा महिन्यांत त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.जर्मनीच्या फोक्सवॅगन समूहाने मंगळवारी आॅडी, स्कोडा व फोक्सवॅगन ब्रँडची ३,२३,७०० वाहने दुरुस्ती करण्यासाठी बाजारातून परत मागविण्याची घोषणा केली होती. सरकारने चौकशी केल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. फोक्सवॅगन समूह अशा एका डिझेल इंजिनचा वापर करीत आहे की ज्यात उत्सर्जन तपासणीत फसवणूक करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. फोक्सवॅगन समूहाच्या डिझेल गाड्यांवरून जगभरात वाद सुरू आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ९ पट जास्तवाहनांच्या तपासानंतर ही फसवणूक उघड झाली. हा सुनियोजित कट आहे. पुढील सहा महिन्यांत आम्ही देशातील सर्व डिझेल प्रवासी वाहनांचा उत्सर्जन स्तर तपासणार आहोत, असे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी एका कार्यक्रमात सांगितले.फोक्सवॅगनने भारतात उत्सर्जनाच्या विद्यमान स्तरापेक्षा आठ-नऊपट उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आपल्या मंत्रालयाने हे प्रकरण भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्याचे ठरविले आहे, असे गीते म्हणाले.
फोक्सवॅगनचे कृत्य हा गुन्हाच
By admin | Updated: December 3, 2015 02:11 IST