Join us  

आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठं यश, पाच महिन्यांत चीनसोबतच्या व्यापारी तुटीत निम्म्याने झाली घट

By बाळकृष्ण परब | Published: October 09, 2020 3:49 PM

aatm nirbhar bharat News : मोदींनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला आता यश मिळताना दिसू लागले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये चीनसोबत होणाऱ्या व्यापारातील तुटीमध्ये तब्बल निम्म्याने घट झाली आहे.

ठळक मुद्देचालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट महिन्यादरम्यानची व्यापारी तूट ही गतवर्षीच्या याच काळातील तुटीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली निर्यातमध्ये झालेली वाढ आणि केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत उचललेल्या पावलांमुळे आयातीमध्ये झालेली घट हे यामागचं मुख्य कारणव्यापाराबाबत चीनवर असलेले अवलंबित्व सातत्याने कमी करण्याचाभारताकडून प्रयत्न

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत मोहिमेची सुरुवात केली होती. दरम्यान, मोदींनी सुरू केलेल्या या मोहिमेला आता यश मिळताना दिसू लागले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये चीनसोबत होणाऱ्या व्यापारातील तुटीमध्ये तब्बल निम्म्याने घट झाली आहे.चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट महिन्यादरम्यानची व्यापारी तूट ही गतवर्षीच्या याच काळातील तुटीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. चीनसोबतच्या व्यापारातील निर्यातमध्ये झालेली वाढ आणि केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत उचललेल्या पावलांमुळे आयातीमध्ये झालेली घट हे यामागचं मुख्य कारण आहे. देशात चीनविरोधी वातावरण तयार झाल्यापासून सरकारने चीनकडून होणाऱ्या आयातीवर अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत. तसेच चीनमधील अनेक प्रकारच्या मालाच्या भारतात होणाऱ्या डम्पिंगला प्रतिबंध घालण्यासाठी डम्पिंग शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या एका वृत्तानुसार एप्रिलते ऑगस्ट २०२० या पाच महिन्यांमध्ये भारत आणि चीन यांच्यातील व्यापारामधील तूट १२.६ अब्ज डॉलर (सुमारे ९३ हजार कोटी रुपये) एवढी राहिली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात याच काळात ही तूट २२.६ अब्ज डॉलर एवढी होती. त्यापूर्वी म्हणजे २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारत आणि चीन यांच्यातील व्यापारामधील तूट या काळात १३.५ अब्ज डॉलर एवढी होती. या प्रकारच्या व्यापारी तुटीमध्ये झालेल्या मोठ्या घटीमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले आत्मनिर्भर भारत आभियान आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्यातील वाढत असलेला तणाव हे मानले जात आहे. दरम्यान व्यापाराबाबत चीनवर असलेले अवलंबित्व सातत्याने कमी करण्याचा प्रयत्न भारताकडून करण्यात येत आहे.एकीकडे चीनमधून होणारी आयात कमी करण्याचा प्रयत्न करत असताना भारताकडून चीनमध्ये होणारी निर्यात वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ऑगस्टमध्ये सलग चौथ्या महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये दोन आकडी वाढ झाली आहे. ही वाढ मुख्यत्वेकरून लोह आणि स्टीलच्या निर्यातीमधून झाली आहे. या काळात चीनमध्ये होणाऱ्या लोह आणि स्टिलच्या निर्यातीमध्ये सुमारे आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच भारतातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्येही एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत मोठी वाढ दिसून आली आहे. या पाच महिन्यांमध्ये भारतातून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीत तब्बल २७ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. गतवर्षी याच काळात भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात ही केवळ ९.५ टक्क्यांनी वाढली होती.

 

टॅग्स :व्यवसायभारतचीनभारत-चीन तणाव