Join us

९.५ लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत

By admin | Updated: August 11, 2015 03:23 IST

१२ जून ते ७ आॅगस्ट या अंदाजे दोन महिन्यांच्या कालावधीत शेअर बाजारात झालेले चढ-उतार आणि त्या अनुषंगाने झालेली गुंतवणूक यांचा मेळ बांधता या कालावधीत गुंतवणूकदारांच्या

मुंबई : १२ जून ते ७ आॅगस्ट या अंदाजे दोन महिन्यांच्या कालावधीत शेअर बाजारात झालेले चढ-उतार आणि त्या अनुषंगाने झालेली गुंतवणूक यांचा मेळ बांधता या कालावधीत गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवरील मूल्यात तब्बल साडेनऊ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारमूल्यात वाढ होत ते १० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या तेजीचे प्रतिबिंब महाकाय वित्तीय संस्था आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्या पोर्टफोलिओमध्ये उमटले असून त्यांच्या समभागांच्या मूल्यांतही घसघशीत वाढ झाली आहे. सेबीकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार या कालावधीत देशी म्युच्युअल फंड कंपन्यांनी बाजारात १२ हजार ८४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली तर विदेशी वित्तीय संस्थांनी या कालावधीत ४८३७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याखेरीज सामान्य गुंतणूकदारांकडूनही दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीत झाली. दोन महिन्यांच्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या निधीमुळे बाजारात आलेल्या मंदीने काढता पाय घेत पुन्हा शेअर बाजाराला तारले गेले. तसेच, यामुळेच गुंतवणूकदारांच्या मालमत्ता मूल्यात घसघशीत वाढ झाली आहे. शेअर बाजारातील तेजीचा फायदा हा सर्वच घटकांतील समभागांना झाल्याचे दिसून आले. यामध्ये लघु, मध्यम आणि महाकाय अशा सर्वच श्रेणीतील कंपन्यांच्या समभाग मूल्यात वाढ झाली आहे. याचाच अर्थ तेजी ही सर्वंकष असल्याचे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे.लघु व मध्यम आकारमानाच्या कंपन्याचा समावेश असलेल्या बीएसई-५००मधील सुमारे १९५ कंपन्यांचा मूल्यात २५ टक्के तर २७६ कंपन्यांच्या समभाग मूल्यात ८ ते २५ टक्के आणि ७५७ कंपन्यांच्या मूल्यात १२ ते १८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. २१ कंपन्यांच्चे बाजारमूल्य १० हजार कोटी रुपयांनी वाढले आहे.मंदीने पळ काढताच जोर वाढलासप्टेंबर २०१३ रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी परतली आणि यानंतर सातत्याने सेन्सेक्सने नवनवे उच्चांक गाठले. मात्र मे २०१५ च्या शेवटच्या आठवड्यापासून शेअर बाजारात काही प्रमाणात मंदीचा शिरकाव झाल्याचे चित्र दिसून आले आणि सेन्सेक्समध्ये घसरण होत तो पुन्हा २६ हजार अंशांच्या उंबरठ्यावर आला. नेमका याच कालावधीत देशी आणि विदेशी वित्तीय संस्थांनी गुंतवणुकीचा जोर वाढविल्याने मंदीने पळ काढला. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यामुळे महाकाय वित्तीय संस्थांनी सोने बाजारातून गुंतवणूक काढून घेत ती भांडवली बाजारात वळविली याचाही फायदा शेअर बाजाराचे व्यवहार वधारण्यात झाला आहे.