Join us

8th Pay Commission : निवृत्त कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा, किती वाढणार पेन्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:41 IST

8th Pay Commission : मोदी सरकारनं नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे.

8th Pay Commission : मोदी सरकारनं नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. २०२५ च्या अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १६ जानेवारी रोजी आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती. या शिफारशींची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासून करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं होतं. सध्या वेतन आणि पेन्शन १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित आहे. आठवा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष युनिफाइड पेन्शन योजनेवर (UPS) आहे.

आठव्या वेतन आयोगामुळे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) अंतर्गत पेन्शनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. यूपीएस १ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल. यात जुनी पेन्शन योजना (ओपीएस) आणि एनपीएस या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये फॅमिली पेन्शन, फिक्स्ड पेन्शनची रक्कम आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन सारख्या लाभांचा समावेश आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टरचा वापर सुधारित वेतन आणि पेन्शनच्या मोजणीसाठी केला जातो. त्यात महागाई, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि सरकारची क्षमता यांचा विचार केला जातो. रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून २.८६ पर्यंत वाढू शकतो. यामुळे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होऊ शकते.

UPS काय, कसा लागू होणार?

हा रिटायरमेंट प्लॅन आहे. यात जुनी पेन्शन योजना आणि एनपीएसचे सर्वोत्तम फीचर्स जोडले गेले आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित लाभ मिळणार आहे. यात कौटुंबिक पेन्शन, निश्चित पेन्शन रक्कम आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन सारख्या तरतुदींचा समावेश आहे. यूपीएस १ एप्रिल २०२५ पासून लागू होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत किमान पेन्शन दरमहा १० हजार रुपये असेल. निवृत्तीच्या वेळी किमान १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळेल. पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनच्या रकमेच्या ६० टक्के रक्कम मिळणार आहे. 

२.८६ चा फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून ५१,४८० रुपये होऊ शकते. ही एक मोठी वाढ असेल. पेन्शनमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या ९,००० रुपयांवरून १७,२८० ते २५,७४० रुपयांपर्यंत वाढू शकते. हे अंतिम फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल.

टॅग्स :सरकारनिवृत्ती वेतन