नवी दिल्ली : भारतातील नोकरी बाजारात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. ८२ टक्के भारतीय कर्मचारी पुढील १२ महिन्यांत नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत. ही टक्केवारी जागतिक सरासरीपेक्षा तब्बल २२ टक्के अधिक आहे.
जागतिक व्यावसायिक सेवा संस्था एऑन पीएलसीने जाहीर केलेल्या यंदाच्या एम्प्लॉयी सेंटिमेंट स्टडी या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ७६ टक्के भारतीय कर्मचारी अधिक चांगल्या लाभांसाठी सध्या मिळत असलेल्या सोयींवर पाणी सोडायला तयार असल्याचेही दिसून आले आहे. वर्क-लाइफ बॅलेन्स, वैद्यकीय सुविधा यांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचेही दिसून आले आहे.
एऑन इंडियाचे ॲश्ले डिसिल्वा यांनी सांगितले की, महागाईचा परिणाम आणि बऱ्याच क्षेत्रांत प्रारंभीचे वेतन स्थिर राहणे हे नोकरी बदलण्यामागची प्रमुख कारणे असावीत. ३० वर्षांपूर्वीच वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, ज्यामुळे तरुण कर्मचारी आता आर्थिक भविष्याकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत. कर्मचारी आता आरोग्यसुविधांवर जास्त भर देऊ लागले आहेत.
४९% कर्मचाऱ्यांना वाटते की, नियोक्त्यांनी त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे.
४५% कर्मचारी सेवानिवृत्ती किंवा दीर्घकालीन बचतीसाठी सहकार्याची अपेक्षा ठेवतात.
३७% महिलांच्या आरोग्यविषयक गरजांवर (जसे की मासिक पाळी, रजोनिवृत्ती) भर देण्याची गरज सांगतात.
३७% कर्मचारी म्हणतात, कंपन्यांनी आर्थिक साक्षरतेवर भर द्यावे, असे मानतात.
३६% कर्मचाऱ्यांना वाटते की बालसंगोपनासाठी नियोक्त्यांनी मदत करावी.
७% भारतीय कर्मचाऱ्यांना वाटते की, त्यांना कमी किंमत दिली जाते, तर हीच संख्या जगात १३ टक्के आहे.
कमी उत्पन्न गटात असंतोष जास्त तीव्र
२६% कमी उत्पन्न गटातील कर्मचाऱ्यांना वाटते की, त्यांना न्याय्य वेतन दिले जात नाही.
६६% कमी उत्पन्न गटाचे कर्मचारी नोकरी बदलणार आहेत.