Join us

७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 01:20 IST

२०१९ पर्यंत ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सूरजकुंड (हरियाणा) : २०१९ पर्यंत ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सूरजकुंड शहरात सुरू असलेल्या तीन दिवसीय दुसऱ्या कृषी संमेलनात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, २०१९ पर्यंत ७७ हजार कोटी रुपये खर्च करून, ७६ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येईल. कृषी क्षेत्रातील भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगून ते म्हणाले की, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी केला आहे. ते लक्ष्य आम्हाला साध्य करायचे आहे. कृषी क्षेत्रात संधी कमी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे, पण हे दावे फेटाळत राजनाथ सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय नाही. शेती क्षेत्रात अनेक संधी आहेत. २१ व्या शतकात सर्वाधिक संधी असणारे हे क्षेत्र आहे. उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतीत नवनव्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना लहरी पावसापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करेल, असा विश्वासही राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील आहे. नोटाबंदीच्या काळात कृषी कर्जावरील ६० दिवसांचे व्याज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. नदीजोड प्रकल्पाबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. शेतीकडे सकारात्मकतेने बघण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.