Join us

सराफांच्या संपामुळे ७० हजार कोटी बुडाले

By admin | Updated: March 21, 2016 02:37 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याच्या प्रस्तावाविरोधात देशात गेले अठरा दिवस झालेल्या संपामुळे तब्बल ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले

मुंबई : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याच्या प्रस्तावाविरोधात देशात गेले अठरा दिवस झालेल्या संपामुळे तब्बल ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा ‘द जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ने (जीजेईपीसी) केला आहे. सरकारने अबकारी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या सराफा संघटनांनी सरकारने व्यावसायिकांच्या समस्यांसदर्भात तीन सदस्य समिती स्थापन केल्यानंतर शनिवारी रात्री संप मागे घेतला. त्यानंतर जीजेईपीसीने पत्रकाद्वारे नुकसानीची आकडेवारी दिली आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात दागिन्यांवरील कराचा उल्लेख केला. इनपूट क्रेडिटसह १ टक्का अबकारी कर दागिन्यांवर लावण्यात येणार आहे. इनपूट क्रेडिटविना हा कर १२.५ टक्के होईल, असे जेटली यांनी सांगितले होते. अर्थसंकल्पाच्या दिवशीच सराफा व्यापारी संपावर गेले. संघटनेचे अध्यक्ष श्रीधर जी व्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबकारी कराच्या मुद्याच्या अनुषंगाने, अबकारी कर विभागाचे अधिकारी सराफा संघटनांवर कोणतीही सक्ती करणार नाहीत तसेच ‘इन्स्पेक्टर राज’ पद्धतीने वर्तणूक मिळणार नाही याची हमी मिळाल्यानंतर हा संप मागे घेतला आहे. सरकारने अबकारी कर मागे घेतला नसला तरी केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.सराफा व्यापाऱ्यांचे आंदोलन मुळात दोन लाखांच्या खरेदीवरील कराविरोधात होते. सुरुवातीला ग्राहकाने दोन लाखांच्या सोन्याची खरेदी केल्यास त्याचा पॅन कार्ड नंबर नोंदविण्याचे बंधन होते. परंतु आता त्यात एक टक्का ‘टीसीएस’ (टॅक्स कलेक्शन अ‍ॅट सोर्स) वसूल करून तो त्या ग्राहकाच्या पॅन नंबरनुसार शासनाकडे जमा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याचे रिफंड मिळण्याची कोणतीही सोय नाही.