Join us  

जीएसटी संकलनात ५९ टक्के घट; जून महिन्यात झाली सुमारे ९१ हजार कोटींची वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 11:30 PM

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ साथीमुळे आर्थिक घडामोडी घटल्या आहेत

नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) जूनमधील संकलन वाढून ९०,९१७ कोटी रुपयांवर गेले आहे. मेमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळे ते ६२,००९ कोटी, तर एप्रिलमध्ये ३२,२९४ कोटी रुपयांवर घसरले होते.

आदल्या महिन्यांच्या तुलनेत जूनमध्ये जीएसटी संकलन वाढले असले तरी वार्षिक आधारावर ते ९ टक्क्यांनी घसरलेले आहे. त्याआधी मेमध्ये ही घसरण ६२ टक्के, तर एप्रिलमध्ये २८ टक्के होती. चालू वित्त वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जीएसटी संकलन ५९ टक्क्यांनी घसरले आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ही घसरण झाली आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-१९ साथीमुळे आर्थिक घडामोडी घटल्या आहेत, तसेच या काळात सरकारने विवरणपत्रे आणि कर भरण्यास सवलत दिली आहे. त्यामुळे जीएसटी संकलनात मोठी घट झाली आहे. मात्र, मागील तीन महिन्यांत त्यात हळूहळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. जूनमधील वाढ चांगली आहे. जूनमध्ये चांगली वाढ नोंदविणाऱ्या राज्यांत पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. याशिवाय ईशान्येकडील सिक्कीम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनीही चांगली वाढ नोंदविली आहे. ईवाय टॅक्स पार्टनर अभिषेक जैन यांनी सांगितले की, कोविड-१९ मुळे पहिल्या तिमाहीत जीएसटी संकलन घटले हे खरे असले तरी जूनचे आकडे परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, याकडे संकेत करीत आहेत.संकलन वाढलेयंदाच्या जूनमध्ये जीएसटीचे एकत्रित संकलन ९०,९१७ कोटी रुपये राहिले. त्यात केंद्रीय जीएसटी १८,९८० कोटी, राज्य जीएसटी २३,९७० कोटी, एकात्मिक जीएसटी ४०,३०२ कोटी (आयात वस्तूवरील १५,७०९ कोटींसह) आणि उपकर ७,६६५ कोटी यांचा समावेश आहे.

टॅग्स :जीएसटी