मुंबई : करपात्र उत्पन्न असूनही कर भरणा न करणाऱ्या तब्बल ५० लाख करदात्यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस धाडण्यास सुरुवात केली आहे. करदायित्व असूनही कर भरणा का केला नाही याचा खुलासा या नोटिशीद्वारे विभागाने मागविला आहे.प्राप्तिकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४-१५ या आर्थिक वर्षात करदायित्व असूनही कर भरणा न केलेल्या करदात्यांची यादी विभागाने तयार केली असून अशा लोकांची संख्या तब्बल ५० लाख ८९ हजार ८३० इतकी आहे. या यादीमध्ये ज्या लोकांनी मोठ्या रकमेचे व्यवहार केले आहेत अशा काही लोकांचाही समावेश असून त्या लोकांनाही नोटीस पाठविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या व्यवहाराचा तपशील आणि उत्पन्नाचा तपशील याचा मेळ तपासला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात अपेक्षित करसंकलन झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर विभागाने अधिक सक्रिय होत करदात्यांची यादी करून नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अशा पद्धतीने नोटिसा पाठविण्यात येत आहेत; परंतु यंदा आर्थिक वर्ष संपतेवेळीच प्राप्तिकर विभाग सक्रिय झाला असून नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाकरिता सरकारने प्र्रत्यक्ष करसंकलनासाठी सात लाख ९६ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे; परंतु फेब्रुवारी अखेरीपर्यंत या लक्ष्याच्या ६९ टक्केच संकलन करण्यात विभागाला यश आले आहे. फेब्रुवारी अखेरीपर्यंत विभागाने पाच लाख ४७ हजार कोटी रुपयांचे करसंकलन केले आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्यपूर्ती करण्यासाठी आणि करसंकलन वाढविण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आता नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे.यांना येणार नोटिसा...- ज्यांचे करपात्र उत्पन्न असूनही कर भरणा केलेला नाही.- ज्यांनी एका आर्थिक वर्षात १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे व्यवहार रोखीने केले आहेत.- ज्यांनी एका आर्थिक वर्षात क्रेटिड कार्डावर दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खर्च केला आहे.
५० लाख नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 02:09 IST