Join us  

कृषी निर्यातीत ४३ टक्के वाढ; सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 3:33 AM

सहा महिन्यांतील वाढ अधिक; गहू, तांदूळ, साखर निर्यातीमध्ये वाढ

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना अर्थव्यवस्थांना मोठा धोका निर्माण झाला होता. असे असले तरी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाच्या कृषी क्षेत्राच्या निर्यातीमध्ये ४३ टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची सुखद माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली.

केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे चालू आर्थिक वर्षातील जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील निर्यातीची माहिती शनिवारी जाहीर करण्यात आली. या तीन महिन्यांत एकूण ५३,६२६.६ कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता त्यामध्ये ४३.४ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये देशातून कृषी क्षेत्राची ३७,३९७.३ कोटी रुपयांची निर्यात झाली होती. त्यामध्ये यंदा ४३.४ टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम ५३,६२६.७ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे कृषी मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.सप्टेंबर २०१९ या महिन्यात देशाच्या कृषी क्षेत्राची निर्यात ५११४ कोटी रुपयांची होती. त्यामध्ये या वर्षात ८१.७ टक्क्याने वाढ झाली असून, सप्टेंबर २०२० या महिन्यात ती ९,२९६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

याशिवाय चालू वर्षाच्या सप्टेंबरपर्यंत आयात-निर्यात व्यापारातील संतुलन साधले गेले आहे. यावर्षी हा व्यापार ९ हजार २ कोटी रुपयांनी फायद्याचा राहिलेला आहे. मागील वर्षी याच कालावधीत आयात-निर्यात व्यापारात २,१३३ कोटी रुपयांची तूट होती. कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था मंदीमध्ये असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी चांगला हात दिला असून, कृषी क्षेत्राची निर्यात वाढण्याचे संकेत आहेत.१) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत शेंगदाण्याची निर्यात ३५ टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे साखरेमध्ये १०४ टक्के, गव्हाची निर्यात २०६ टक्के, तर बासमती तांदळाची निर्यात १३ टक्क्यांनी वाढली आहे.२) बासमती तांदळाशिवाय अन्य प्रकारच्या तांदळाच्या निर्यातीमध्येही १०५ टक्क्यांची मोठी वाढ झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कृषी क्षेत्रातील निर्यात वाढावी यासाठी सरकारने २०१८ मध्येच कृषी निर्यात धोरणाची घोषणा केली असून, त्याला आता चांगली फळे मिळत आहेत.

टॅग्स :शेतीकेंद्र सरकार