Join us  

भारतीय स्टार्टअप्सची ‘युनिकॉर्न’ कामगिरी! ब्रिटनला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:01 PM

गेल्या काही दिवसांपासून भारतात स्टार्टअपच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात स्टार्टअपच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे, तर अनेक स्टार्टअप्सनी उत्तम कामगिरी करत त्याचे रुपांतर बड्या उद्योगात केल्याचेही दिसून आले. यामुळे अन्य स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली. यातच आता भारतीय स्टार्टअप्स कंपन्यांनी कमाल करत ब्रिटनला धोबी पछाड दिला आहे. यासह युनिकॉर्न यादीत तिसऱ्या स्थानावर मोठी झेप घेतली आहे. 

हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या यादीत युनिकॉर्न कंपन्यांची माहिती देण्यात आली आहे. भारताची कामगिरी बरीच सुधारली आहे, पण अमेरिका आणि चीन अजूनही खूप पुढे आहेत. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एका वर्षाच्या आत भारतातील १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या ३३ स्टार्टअप कंपन्यांना 'युनिकॉर्न'चा दर्जा मिळाला आहे.

अमेरिकेत २५४ युनिकॉर्न कंपन्या उभारल्या

यंदाच्या वर्षी अमेरिकेत तब्बल २५४ युनिकॉर्न कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठित यादीमध्ये समाविष्ट झालेल्या कंपन्यांची संख्या ४८७ झाली आहे. दुसरीकडे, चीनमध्ये या वर्षी ७४ युनिकॉर्न कंपन्या आल्या असून त्यांची एकूण संख्या ३०१ झाली आहे. तसेच भारतातील ३३ स्टार्टअप कंपन्या एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकनासह युनिकॉर्नचा दर्जा मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. 

भारतात एकूण ५४ युनिकॉर्न स्टार्टअप झाले

भारतात एकूण ५४ युनिकॉर्न स्टार्टअप झाले आहेत. तर ब्रिटनमध्ये या वर्षी १५ नवीन युनिकॉर्नच्या निर्मिती झाली असून त्यांची एकूण संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत. भारत सध्या स्टार्टअप विस्फोटाच्या स्थितीत आहे. भारतात एका वर्षात युनिकॉर्नची संख्या दुप्पट झाली आहे, अशी माहिती रिपोर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी दिली आहे. 

टॅग्स :व्यवसाय