नवी दिल्ली : पार्सल कार्गो एक्स्प्रेस ट्रेन्सचा अपुरा वापर केल्यामुळे रेल्वेचे ३१४.६४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका महालेखापालांनी (कॅग) ठेवला आहे. पार्सल कार्गो एक्स्प्रेस ट्रेन्स योजनेची अंमलबजावणी नसणे आणि समन्वयाचा अभाव यामुळे हे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.२००७ मध्ये रेल्वेने खासगी सेवा देणाऱ्यांमार्फत घरोघर सेवा देण्यासाठी पार्सल कार्गो एक्स्प्रेस ट्रेन्स करारावर देण्याची योजना तयार केली होती; परंतु रेल्वे अधिकारी ठराविक मार्ग आणि वेळापत्रकानुसार या रेल्वे उपलब्ध करून देऊ शकले नाहीत, की त्यासाठी समाधानकारक व्यवस्था करू शकले नाहीत, असे कॅगने ताज्या अहवालात म्हटले आहे. चार मार्गांवर ही सेवा सुरू न झाल्यामुळे रेल्वेचा ३१४.६४ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. ही योजना राबविताना दक्षिण रेल्वेला आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वे मंडळाला सांगण्यातच आले नाही व पर्यायाने ही योजना दक्षिण रेल्वे विभागात अपयशी ठरली, असे कॅगने म्हटले आहे. योजना राबविताना आलेल्या अडचणी दक्षिण रेल्वेच्या प्रशासनाने अन्य विभागीय अधिकाऱ्यांशी समन्वय राखून न कळविल्यामुळे त्यावर समन्वयातून कोणताही उपाय शोधला गेला नाही. अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
३१४ कोटींचे नुकसान; कॅगचे रेल्वेवर ताशेरे
By admin | Updated: December 1, 2014 00:20 IST