Join us
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्यांमुळे बुडाले सरकारचे ३० हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 04:11 IST

पीएनबी व नंतर रोटोमॅक या दोन घोटाळ्यांमुळे केंद्र सरकारचे बँकांमधील शेअर्सचे मूल्य तब्बल ३० हजार कोटी रुपयांनी घटले आहे

मुंबई/नवी दिल्ली : पीएनबी व नंतर रोटोमॅक या दोन घोटाळ्यांमुळे केंद्र सरकारचे बँकांमधील शेअर्सचे मूल्य तब्बल ३० हजार कोटी रुपयांनी घटले आहे. बँकांमधील सरकारच्या शेअर्सचे मूल्य आठवडाभरात २.९० लाख कोटी रुपयांवरून २.६० लाख कोटी रुपयांवर आले आहे.हिरे व्यावसायिक नीरव मोदीने ११,४०० कोटी रुपयांच्या पीएनबीत केलेल्या घोटाळ्यानंतर दोनच दिवसांनी रोटोमॅक या कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने सरकारी बँकांचे ३,६९५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचे समोर आले. या दोन्ही घोटाळ्यांमुळे सरकारी बँकांमधील शेअर्सच्या किमतीत मोठी घट सुरू आहे. त्याच्या थेट फटका केंद्र सरकारला बसत आहे. केंद्र सरकारच्या स्टेट बँकेतील ५७ टक्के असलेल्या शेअर्सचे मूल्य ७ टक्क्यांनी घसरून १.३१ लाख कोटी रुपयांवर आले. युको बँकेतील शेअर्सचे मूल्य ९ टक्के, बँक आॅफ बडोदातील १५ टक्के व बँक आॅफ इंडियातील सरकारी गुंतवणुकीच्या मूल्यात १४ टक्क्यांची घट आठवडाभरात झाली आहे.विमा व म्युच्युअल फंड कंपन्यांनाही घोटाळ्याचा फटका बसला आहे. म्युच्युअल फंडांच्या बँकिंग क्षेत्रातील शेअर्सचे मूल्य ४ टक्के अर्थात, ४४ हजार कोटी रुपयांनी कमी होऊन ते १.७५ लाख कोटी रुपयांवर आले आहे. विमा कंपन्यांची ४० बँकांमध्ये ५ ते १५ टक्के गुंतवणूक आहे. त्यांच्या या गुंतवणुकीचे मूल्यही ६ टक्क्यांनी घटून १.१४ लाख कोटी रुपयांवर आले आहे.एकट्या एलआयसीला ७ टक्क्यांचे नुकसान सोसावे लागले असून, त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील गुंतवणुकीचे मूल्य ८६,५८३ वरून ८०,५९० कोटी रुपयांवर आले आहे. एलआयसीच्या पीएनबीमधील शेअर्सचे मूल्य ५,४६४ कोटींवरून ३,९३८ कोटी रुपयांवर आले.बडोदा बँकेने २वर्षे दाबला घोटाळारोटोमॅकचे विक्रम कोठारीने बँक आॅफ बडोदाकडून घेतलेले ४३५ कोटी रुपयांचे कर्ज आॅक्टोबर २०१५ मध्ये एनपीए झाले. मात्र, बँकेने २ वर्षे काहीच हालचाल केली नाही. डिसेंबर २०१७ मध्ये या एनपीएला ‘घोटाळा’ श्रेणीत टाकले. नीरव मोदी घोटाळा समोर आल्यानंतर बँकेने सीबीआयकडे धाव घेतली. यामुळे बँकेने २ वर्षे हा घोटाळा का दाबून ठेवला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.रोटोमॅक घोटाळ्यात सीबीआयने बुधवारी विक्रम कोठारीचा मुलगा राहुल याची दिल्लीत चौकशी केली. सीबीआयने मंगळवारी विक्रम कोठारीची कानपूर येथील घरी चौकशी केली होती. त्यानंतर, त्याला दिल्लीत आणण्यात आले.विक्रम कोठारी, पत्नी साधना व मुलगा राहुल हे तिघेही रोटोमॅक ग्लोबल लिमिटेडचे संचालक आहेत.कोठारीने बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्टÑ, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, अलाहाबाद बँक व ओरिएन्टल बँक आॅफ इंडिया या ७ बँकांमधून बेकायदेशीररीत्या कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक घोटाळा