Join us

३ बँकांचे एटीएम व्यवहार मर्यादीत

By admin | Updated: November 10, 2014 03:27 IST

एटीएमद्वारे जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना आता एका महिन्यात तीननंतर प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये मोजावे लागतील

मुंबई : एटीएमद्वारे जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना आता एका महिन्यात तीननंतर प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये मोजावे लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक आॅफ इंडियासह एचडीएफसी व अ‍ॅक्सिस बँकेने ६ महानगरांत पाचऐवजी तीनच व्यवहार मोफत केले आहेत. ग्राहकाला त्याची बँक वगळता अन्य बँकेचे एटीएम एका महिन्यात दोनवेळा विनामूल्य वापरता येईल.आरबीआयने परिपत्रकाद्वारे महानगरांमध्ये एका महिन्यात ग्राहकाला त्याच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएमवर तीन व अन्य बँकेच्या एटीएमवर दोनच व्यवहार विनामूल्य करण्यास बँकांना सांगितल्यानंतर या पाच व्यवहारांना शुल्क आकारण्याचा या बँकांनी निर्णय घेतला. स्टेट बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिस आणि एचडीएफसी बँकांच्या ग्राहकांना ही नवी मर्यादा आणि दर मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि नवी दिल्लीत लागू आहेत. आर्थिक वर्ष २०१३-२०१४ मध्ये स्टेट बँकेला अन्य बँकांच्या ग्राहकांनी स्टेट बँकेचे एटीएम वापरल्यामुळे तब्बल ४०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगण्यात येते. यानंतर या बँकेने १ नोव्हेंबर २०१४ पासून केवळ तीन व्यवहारच विनामूल्य उपलब्ध करून दिले व नंतरच्या प्रत्येक व्यवहाराला २० रुपये शुल्क आकारले. तथापि, स्टेट बँकेने जे ग्राहक बँकांच्या शाखांना भेट देण्याचे टाळतील त्यांना व ज्यांच्या खात्यात फार मोठी रक्कम शिल्लक असते अशांना एटीएमवर हवे तेवढे व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)