Join us
Daily Top 2Weekly Top 5

२,८०० बँक कर्मचाऱ्यांचा व्हीआरएससाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 04:43 IST

एसबीआयच्या पाच सहयोगी बँकातील २,८०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) अर्ज केला

मुंबई : एसबीआयच्या पाच सहयोगी बँकातील २,८०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी (व्हीआरएस) अर्ज केला आहे. एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली. पाच सहयोगी बँकांचे नुकतेच एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले आहे. स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ म्हैसूर, स्टेट बँक आॅफ पटियाला, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक या सहयोगी बँकांचे १ एप्रिलपासून स्टेट बँक आॅफ इंडियात विलीनीकरण झाले आहे. अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, व्हीआरएसची ही योजना ५ एप्रिलपर्यंत खुली असून, आतापर्यंत या योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तशी कमी आहे. व्हीआरएससाठी सहयोगी बँकांतील १२ हजार कर्मचारी पात्र आहेत. त्यापैकी २,८०० कर्मचाऱ्यांनीच व्हीआरएससाठी अर्ज केलेला आहे. स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी बँकेत २० वर्षे सेवा आवश्यक आहे. याशिवाय वयाची ५५ वर्षे पूर्ण झालेली असावीत, अशी अट आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)>कर्ज देणारी सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या आता २ लाख ७० हजारांवर गेली आहे. यापैकी ६९,१९१ कर्मचारी सहयोगी बँकांतील आहेत. विलीनीकरणानंतर एसबीआय बँक संपत्तीच्या बाबतीत जगातील प्रमुख ५० बँकांच्या यादीत आली आहे, तर देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक झाली आहे. एसबीआयचे देशातील एकूण ग्राहक ३७ कोटींवर आहेत. देशात बँकेच्या २४ हजार शाखा असून, ५९ हजार एटीएम आहेत.