नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना अधिक मजबूत करण्यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये सरकार २५ हजार कोटी रुपये त्यांना देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. आयडीबीआय बॅँकेमधील सरकारचे भांडवल ५० टक्क्यांच्या खाली आणण्याचेही उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांच्या एकत्रीकरणासाठीचा आराखडाही तयार करीत असल्याचे त्यांनी घोषित केले.संसदेत अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री जेटली म्हणाले की, आमच्या सार्वजनिक क्षेत्रातील बॅँका या बळकट झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे त्या स्पर्धेला तोंडही देऊ शकल्या पाहिजेत. यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये बॅँक बोर्ड ब्युरो हा कार्यरत होईल. या ब्युरोकडून सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांच्या एकत्रीकरणाबाबतचा आराखडा तयार केला जाणार आहे. आयडीबीआय बॅँकेतील सरकारचे भागभांडवल कमी करण्याबाबतची प्रक्रिया याआधीच सुरू झाल्याचेही जेटली यांनी सांगितले. सरकारी बॅँकांना मजबूत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे सांगून आगामी आर्थिक वर्षात या बॅँकांच्या भागभांडवलामध्ये वाढ करण्यासाठी २५ हजार कोटी रुपये गुंतविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापेक्षा जास्त रकमेची गरज या बॅँकांना भासल्यास त्यासाठी कसा पैसा उभा करावयाचा ते सरकार ठरवेल, असेही ते म्हणाले. बॅँकांच्या थकीत कर्जाबाबत जेटली म्हणाले, हा पूर्वीचाच वारसा आहे.
बॅँकांना २५ हजार कोटी
By admin | Updated: March 1, 2016 03:32 IST