२१०० रोपांतून साकारला ग्रीन गणेशा
By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST
अनोखा उपक्रम : सिडकोतील लायन्स डायमंड गणेश मंडळ
२१०० रोपांतून साकारला ग्रीन गणेशा
अनोखा उपक्रम : सिडकोतील लायन्स डायमंड गणेश मंडळ औरंगाबाद- गणेशोत्सवात नारळाचा गणपती, चॉकलेटचा गणपती, बिस्किटांचा गणपती, फुलांचा गणपती आपण पाहिले आहेत. यंदा मात्र सिडकोतील लायन्स डायमंड गणेश मंडळाने चक्क २१०० रोपांतून इको ग्रीन गणेशा साकारला आहे. औषधी वनस्पती, भाज्या, फळभाज्या, शोभिवंत फुलांचा वापर यासाठी करण्यात आला आहे. मागील तीन आठवड्यांपासून लायन्स डायमंड गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी इको फ्रेंडली प्रतिमा साकारत होते. अखेर आज सोमवारी १ सप्टेंबर रोजी ही प्रतिमा तयार झाली. २५ फूट बाय २० फुटांची ही भव्य प्रतिमा नावीन्यपूर्ण ठरत आहे. तुळस, गहू, ज्वारी, मका, हरभरा, सोनगिरी, गोल्डन बुरांडा, पिंजरी, मनी प्लांटच्या रोपातून ही प्रतिमा साकारली आहे. विशेष म्हणजे शहाळे अर्धे कापून त्याचा वापर गणरायाच्या डोळ्यासाठी करण्यात आला. बुबुळासाठी बीटचा वापर करण्यात आला आहे. एकदंतासाठी मुळ्याचा खुबीने वापर केला असून उंदरासाठी हरिसन या नावाच्या वनस्पतीचा वापर केला आहे. ही प्रतिमा तयार करण्यासाठी फळ्यांचा वापर केला. या फळ्यांमध्ये रोप उगविण्यात आले. तसेच मूर्ती आणखी उठावदार दिसण्यासाठी झेंडूची फुले, शोभिवंत फुलांचा वापरही करण्यात आला आहे. ही नावीन्यपूर्ण प्रतिमा सिडको, एन-६ परिसरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयासमोर उभारण्यात आली आहे. यासाठी वैभव काला, प्रशांत बावकर, प्रमोद लोणगावकर, कल्याण ढवळे, अनिल उबरहंडे, सतीश मापारी, अ. ल. कुलकर्णी, प्रशांत मिरकुटे, अशोक कुलकर्णी, प्रफुल्ल सावजी, विनायक पालकर, वैभव कोरडे, गजानन मापारी, सुरेश हिंगमिरे, संदीप राठोड, पौर्णिमा मुरकुटे, अलका कोरडे, सविता कुलकर्णी, नीता कुलकर्णी, अंकिता कोरडे आदींनी परिश्रम घेतले. चौकटरोपांचे मोफत वाटप होणार २१०० रोपांतून साकारलेल्या भव्य ग्रीन गणेशाची प्रतिमा सार्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी सांगितले की, श्री विसर्जनाच्या दिवशी या प्रतिमेतील रोपे गणेशभक्तांना मोफत वाटप करण्यात येणार आहेत. कॅप्शनग्रीन गणेशा कल्पकता व कलात्मकतेचा वापर केल्यास कशातूनही गणेशाची प्रतिमा साकारली जाऊ शकते. सिडको, एन-६ येथे तब्बल २५ फूट बाय २० फु टांची ग्रीन गणेशाची भव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. २१०० रोपे तयार करून त्यातूनही प्रतिमा साकारणारे हेच ते लायन्स डायमंड गणेश मंडळाचे पदाधिकारी.