Join us

‘छत्रपती’ कारखान्याला 21 कोटींचा दंड

By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST

साखर आयुक्तांचे आदेश : परवाना न घेताच केले गाळप

साखर आयुक्तांचे आदेश : परवाना न घेताच केले गाळप
बारामती : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील र्शी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला परवाना न घेताच गाळप केल्याप्रकरणी तब्बल 21 कोटी 36 लाख 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलकडे कारखान्याची सत्ता आहे.
2015-16 च्या हंगामात गाळप केलेल्या उसावर प्रतिटन 500 रुपये दराने हा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.
छत्रपती साखर कारखान्याने यंदाचा हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील थकबाकी महिन्यात देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर साखर आयुक्तांनी गाळप परवाना दिला होता. मात्र, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालकांनी वारंवार सुनावण्या घेऊन त्याबाबत सूचना दिल्यानंतरही मागील हंगामातील प्रतिटन 130 रुपये थकबाकी सभासदांना अदा केली नाही.
अजित पवार यांनी कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची करून पॅनल उभे केले होते. त्यांच्या पॅनलला पूर्ण बहुमतही मिळाले. कारखान्याने थकबाकी दिली नसल्याबद्दल शेतकरी कृती समितीच्या वतीने पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर यांनी तक्रार केली आहे. एफआरपीमधून कपात करता येत नाही. मंत्री समितीच्या आदेशानुसार संबंधित कपात बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणले होते. त्यावर साखर आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले. दंडाची रक्कम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँक प्रतिनिधी, चीफ अकाऊंटन्ट, कार्यकारी संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे. (प्रतिनिधी)