Join us  

२२ ने गरिबांचे वाजवले १२! ६८.५ कोटी लोक गरिबीच्या खाईत लाेटले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 9:20 AM

जागतिक बँकेच्या अहवालातून खुलासा

नवी दिल्ली : अमेरिका आणि अन्य विकसित देशांसह जगभरात आर्थिक मंदी गडद होण्याची शक्यता असून १९७० नंतर यंदाच्या वर्षी सर्वाधिक वेगाने मंदीचा शिरकाव होत आहे. त्याचा परिणाम म्हणून २०२२ च्या अखेरपर्यंत ६८.५ कोटी लोक आत्यंतिक गरिबीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, गरिबी निर्मूलनाच्या बाबतीत २०२० नंतर २०२२ हे सर्वाधिक वाईट वर्ष ठरले आहे. 

आर्थिक सुधारणांना खीळकोरोना, रशिया-युक्रेन युद्ध, इंधन व खाद्यक्षेत्रातील महागाई यांमुळे जगभरातील ६० टक्के देश कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. या देशांत आर्थिक सुधारणांसह आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणविषयक सुधारणांना खीळ बसली आहे. जगभरात मंदीचा फटका बसत असल्याने गरिबीत आणखी वाढ होत होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगाला भोगावे लागणार परिणाम - रिझर्व्ह बँकरिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ‘स्टेट ऑफ द इकॉनॉमी’ या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, जगभरातील केंद्रीय बँकांनी पतधोरणासंबंधी कडक भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे कर्जे महागली आहेत. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेला २०२३ मध्ये भोगावा लागेल. जागतिक अर्थव्यवस्था अंदाजात जोखीम कायम आहे. त्यामुळे चलन व वृद्धिदरात घसरण होऊ शकते.

चीनमध्ये ६० लाख लोक उपासमारीच्या विळख्यात चिनी नियतकालिक ‘कॅक्सिन’च्या वृत्तानुसार, चीनमध्ये कोरोनामुळे कोट्यवधी लोक कर्जात बुडाले आहेत. ६० लाख लोक उपासमारीच्या विळख्यात सापडले आहेत. त्याचप्रमाणे २०.५ टक्के परिवार दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलले गेले आहेत.

क्रिप्टाेकरन्सीमुळे येणार नवे आर्थिक संकटखासगी क्रिप्टोकरन्सीसारखी सट्टाबाजीची साधने जर वाढण्याची परवानगी दिली तर त्यामुळे नवीन आर्थिक संकट ओढवू शकते, असा इशारा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. यावेळी दास यांनी बिटकॉईनसारख्या इतर क्रिप्टोंवरही बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. दास क्रिप्टोकरन्सीच्या अतिशय विरोधात असून, ते या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

इतिहासातील सर्वांत मोठी आर्थिक फसवणूकगेल्या एक वर्षातील घटना पाहता क्रिप्टोकरन्सी ही इतिहासातील सर्वांत मोठी आर्थिक फसवणूक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे अशा चलनांबाबत आमची भूमिका काय असेल हे सांगण्याची गरज नाही, असे दास म्हणाले.

टॅग्स :वर्ल्ड बँक