Join us

२00५ पूर्वीच्या नोटा ११ दिवसांत बदला!

By admin | Updated: December 22, 2014 04:42 IST

२00५ सालापूर्वी छापलेल्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २0१५ पासून होणार आहे.

नवी दिल्ली : २00५ सालापूर्वी छापलेल्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी १ जानेवारी २0१५ पासून होणार आहे. याचाच अर्थ या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांकडे आता फक्त ११ दिवस शिल्लक आहेत. चलनात असलेल्या नोटांत संगती असावी, तसेच बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेने २00५ सालापूर्वी छापलेल्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. अशा नोटा नागरिकांकडे असल्यास त्या बदलून घेण्यासाठी १ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत १४४.६६ कोटी नोटा नागरिकांना बदलून देण्यात आल्या आहेत. या नोटांचे एकत्रित मूल्य ५२,८५५ कोटी रुपये आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २00५ नंतरच्या नोटांवर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष फिचर आहेत. या नोटांची नक्कल करणे अवघड आहे. नकली नोटांचा प्रसार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही खबरदारी घेतली आहे. २00५ आधीच्या नोटांमध्ये सुरक्षा फिचरांचा अभाव आहे. या नोटांची नक्कल करणे अधिक सुलभ आहे. चलनात असलेल्या बनावट नोटा याच नोटांची नक्कल करून बनविण्यात आलेल्या आहेत.