Join us  

बँकांतून आजपासून बदलून घेता येणार २ हजारच्या नोटा; आरबीआयचे गव्हर्नर म्हणाले, ३० सप्टेंबरपर्यंत वाट पाहू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 6:04 AM

४ महिने आहेत बँकांत गर्दी करू नका, 'ती' नाेट वैधच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार असून, ४ महिन्यांचा अवधी असल्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी बँकांत गर्दी करू नका, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. नोटा बदलण्यासाठी अथवा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. ताेपर्यंत किती नाेटा परत येतील, हे स्पष्ट हाेईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,  असे दास यांनी स्पष्ट केले. नोटा बदलून घेण्यासाठी ओळखपत्राची गरज राहणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. 

दास यांनी सांगितले की, २ हजार रुपयांची नाेट परत बाेलाविण्याचा परिणाम फार कमी राहील. देशातील एकूण चलनापैकी २ हजार रुपयांच्या नाेटा केवळ १०.८ टक्के आहेत. या नाेटांचा वापर फार कमी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवर त्याचा फार परिणाम हाेणार नाही. २ हजार रुपयांची नाेट वैध चलन राहील. ३० सप्टेंबरपर्यंत वाट पाहू. पुढे काय हाेणार याबाबत मला संदिग्ध स्वरूपातील उत्तर द्यायचे नाही, असे दास म्हणाले.

१ हजाराची नाेट येणार नाहीएक हजार रुपयांची नाेट पुन्हा येणार नाही. ही नाेट बाजारात आणण्याचा काेणताही प्रस्ताव नाही, असे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले.

‘हेतू पूर्ण झाला’५०० आणि १००० रुपयांच्या नाेटा बंद केल्यानंतर चलनाचा तुटवडा दूर करण्यासाठी या २ हजार रुपयांची नोटा छापल्या हाेत्या. हा हेतू पूर्ण झाला आहे. सध्या २ हजार रुपयांच्या नोटांचा वापरही कमी झालेला असून, छपाईदेखील बंद केली आहे. - शक्तिकांत दास 

१०० रुपयांचे पेट्रोल, देतात गुलाबी नोट२ हजार रुपयांची नाेट पेट्राेलपंपावर माेठ्या प्रमाणावर खपविली जात आहे.  काही वाहनधारक पेट्रोल पंपावर १०० ते २०० रुपयांचे पेट्रोल घेतात व कर्मचाऱ्याच्या हातात २ हजार रुपयांची नोट देत आहेत. यामुळे वादावादी वाढली आहे. जिथे दररोज ३ ते ४ गुलाबी नोटा येत होत्या, तिथे पेट्रोल पंपावर आता दोन ते अडीच लाख मूल्याच्या गुलाबी नोटा गल्ल्यात जमा होत आहेत. 

कालपर्यंत युपीआय, आता २ हजारांची नाेटकालपर्यंत प्रत्येक जण ‘युपीआय’द्वारे पैसे देत हाेता. मात्र, आता दुकानात येणारा जवळपास प्रत्येक व्यक्ती २ हजार रुपयांची नाेट घेऊन येत आहे, अशी मार्मिक प्रतिक्रिया दिल्लीतील एका दुकानदाराने दिली. लाेक किरकाेळ खरेदीसाठी ही नाेट देत आहेत. मात्र, व्यापारी यामुळे त्रस्त झाले आहेत. तरीही अनेक जण या नाेटा स्वीकारत आहेत, मात्र, काही जण ते घेत नाहीत. 

‘विना ओळखपत्र नाेटा बदली नकाे, जनहित याचिकादाेन हजार रुपयांची नाेट बदलण्यासाठी काेणतेही ओळखपत्र लागणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. याविराेधात भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. विना ओळखपत्र या नाेटा स्वीकारण्यास मनाई करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकनोटाबंदी