दुबई : आणखी फक्त ६ वर्षांनी (२०२०) जगात प्रत्येक तीन मोबाईल कनेक्शनमधील दोन स्मार्ट फोन असतील. २०१४ मध्ये भारत हा हायटेक फोनसाठी मोठी बाजारपेठ असलेला जगातील चौथा देश ठरला आहे.जीएसएमए इंटेलिजन्सने तयार केलेल्या ‘स्मार्ट फोन अनुमान व मान्यता, २००७-२०२०’ अहवालात म्हटले आहे की, आज जगातील प्रत्येक ३ मोबाईल कनेक्शनमध्ये एक कनेक्शन स्मार्ट फोन आहे आणि येत्या सहा वर्षांत स्मार्ट फोनची संख्या तीन पटीपेक्षाही जास्त होऊन २०२० पर्यंत ६ अब्जांपर्यंत गेलेली असेल.यानुसार २०२० पर्यंत ९ अब्ज मोबाईल कनेक्शनमध्ये दोन तृतीयांश कनेक्शन स्मार्ट फोनचे असतील. राहिलेल्यांमध्ये बेसिक फोन, फिचर फोन आणि डाटा टर्मिनलसारखे टॅबलेट, डोंगल व राऊटर्सचा समावेश असेल.जीएसएमएचे मुख्य रणनीती अधिकारी ह्यून्मी यांग यांनी सांगितले की, स्मार्ट फोनने जागतिक स्तरावर नव्या बदलाचे वारे आणले आहेत, त्यामुळे कोट्यवधी लोकांपर्यंत नव्या सेवा पोहोचत आहेत व कारभार कार्यक्षमतेनेही होत आहे. येत्या दीड वर्षात १ अब्ज नवे स्मार्ट फोन कनेक्शन जोडले जाण्याची शक्यता आहे. २०११ च्या अहवालानुसार स्मार्ट फोन कनेक्शनचा विचार केला तर विकसनशील देशांनी विकसित देशांना मागे सारले आहे. (वृत्तसंस्था)
प्रत्येक ३ मोबाईलमधील २ असतील स्मार्ट फोन
By admin | Updated: September 22, 2014 23:05 IST