नवी दिल्ली : रोजगार संधी वाढविण्यावर सरकारचा भर असताना आॅनलाईन नियुक्त्यांमध्ये १६ टक्क्यांची वाढ झाली. वर्षाच्या आधारावर आॅक्टोबरमध्ये आॅनलाईन नियुक्त्यांमध्ये १६ टक्के वाढ झाल्यामुळे रोजगाराची बाजारपेठ मजबूत दिसली, असे मॉन्स्टर डॉट कॉमच्या अहवालात म्हटले आहे.सरकारकडून होणारी गुंतवणूक आणि रोजगार वाढीसाठी होणारे सततचे प्रयत्न यामुळे येत्या काही महिन्यांत रोजगाराच्या बाजारपेठेने चांगले बाळसे धरलेले असेल. आॅक्टोबर महिन्यासाठी मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्स १४४ होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत (१२४) त्यात १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. मॉन्स्टर डॉट कॉमचे भारत, पश्चिम एशिया, दक्षिण पूर्व एशिया, हाँगकाँगचे व्यवस्थापकीय संचालक संजय मोदी यांनी सांगितले की, गुंतवणुकीवर सरकारचा असलेला भर, काही धोरणात्मक ठाम निर्णयांसह पायाभूत सोयी आणि संरक्षण प्रकल्पांना मंजुरीमुळे कारभाराबद्दल विश्वास वाढला आहे व पर्यायाने रोजगाराच्या बाजारपेठेत विश्वास निर्माण झाला आहे. बीपीओमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये सातत्याने सकारात्मक वार्षिक वाढ झाली आहे. रोजगारवाढीचा विचार करता बंगळुरू देशात सगळ्यात पुढे आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
आॅनलाईन नियुक्त्यांमध्ये १६ टक्के वाढ
By admin | Updated: November 20, 2014 01:31 IST