नवी दिल्ली : सरकारी मालकीची बीएसएनएल ही दूरसंचार कंपनी १५ जूनपासून देशभरात इनकमिंग कॉल ‘फ्री रोमिंग’ करणार असल्याची माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी येथे दिली. खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी उचललेले हे आक्रमक पाऊल मानले जाते.बीएसएनएलचे गाडे रुळावर आले असून ही कंपनी १५ जूनपासून देशपातळीवर फ्री रोमिंगची सुविधा देणार असल्याचे त्यांनी येथे रालोआ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. मोबाईल नंबरची पूर्णपणे पोर्टेबिलिटी यावर्षी जुलैपासून लागू केली जाणार असताना ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. मार्चअखेर बीएसएनएल मोबाईलधारकांची संख्या ७.७२ कोटी झाली आहे. ग्राहकांना रोमिंगच्या काळात मोफत इनकमिंग कॉलची सुविधा दिल्याने काही प्रमाणात महसूल घटणार असला तरी नवे ग्राहक मिळवून त्याची भरपाई केली जाईल, असे बीएसएनएलचे सीएमडी अनुपम श्रीवास्तव यांनी पत्रपरिषदेत सांगितले. इनकमिंग कॉल रोमिंग फ्री ठेवण्याची सुविधा फक्त एक वर्षासाठी असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१५ पासून बीएसएनएलचे देशभरात फ्री रोमिंग..!
By admin | Updated: June 3, 2015 00:04 IST