Join us

१५ दिवसांत टोमॅटो होणार स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:03 IST

टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने, सामान्यांच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो सद्या गायब झाल्याचे चित्र दिसत आहे, पण आगामी १५ दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल

नवी दिल्ली : टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने, सामान्यांच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो सद्या गायब झाल्याचे चित्र दिसत आहे, पण आगामी १५ दिवसांत टोमॅटोच्या दरात मोठी कपात होईल, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) व्यक्त केले आहे. दक्षिण आणि अन्य राज्यातून टोमॅटोची आवक आगामी काळात वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.टोमॅटोच्या टंचाईमुळे सद्या हे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशाच्या अनेक भागांत टोमॅटोचे दर एक महिन्यापासून गगनाला भिडले आहेत. किरकोळ विक्रीत हे दर किमान १०० रुपये किलो आहेत. पाऊस आणि पूर यामुळे भाजी मंडईत भाजीपाला घेऊन येण्यासाठी वेळ तर लागत आहे. दिल्ली टोमॅटो मर्चंट असोसिएशनचे अशोक कौशिक यांनी सांगितले की, मालवाहतुकीसाठी अधिक वेळ लागत असल्याने खर्चात वाढ होत आहे. आगामी दोन आठवड्यात आवक वाढू शकेल. २०१६-१७ या वर्षात म्हणजेच, जुलै ते जून या काळात देशात टोमॅटोचे उत्पादन १५ टक्के अधिक १८७ लाख टन होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्याच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतरच वास्तविक आकडेवारी समोर येईल.