मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) १५.५४ कोटी सदस्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यांचे २०१४-१५ या वर्षाचे हिशेब एकाच दिवसात पूर्ण करून आपल्या कामकाजाचे ‘डिजिटायझेशन’ करण्याच्या वाटेवरील आणखी एक लक्षणीय मैलाचा दगड पार केला आहे.प्रॉव्हिडन्ट फंड (पीएफ) खात्यांचे वित्तीय वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे. नियमांनुसार ’ईपीएफओ’ने सदस्यांच्या खात्यांचे आदल्या वित्तीय वर्षाचे हिशेब उशिरात उशिरा पुढील वषार्तील ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. पूर्वी वित्तीय वर्ष संपून त्यानंतरचा सप्टेंबर उलटला तरी या खात्यांचे हिशेब पूर्ण होऊन ती अद्ययावत (अपडेट) होत नसत.परंतु २०१४-१५ हे वित्तीय वर्ष याला अपवाद ठरले आहे. नव्या वित्तीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व खात्यांचे हिशेब अद्ययावत करण्याची कामगिरी ‘ईपीएफओ’ने आपल्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पार पाडली आहे. नव्या वित्तीय वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ एप्रिल रोजी सर्व १५.५४ कोटी खात्यांचे हिशेब पूर्ण करून ती त्या दिवसापर्यंत अद्ययावत करण्यात आली, असे ‘ईपीएफओ’ने प्रसिद्धीसाठी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.या निवेदनानुसार पूर्वी सर्व खाती अद्ययावत करण्यास कित्येक वर्षे लागायची. वर्ष २०१४-१५ मध्ये असे प्रथमच घडले की ३० सप्टेंबरच्या मुदतीआधी ९९ टक्क्यांहून अधिक खात्यांचे हिशेब पूर्ण केले गेले. नवे वर्ष १ एप्रिलला सुरु झाले त्या दिवशी सर्व खाती त्या दिवसापर्यंतचे हिशेब पूर्ण करून अद्ययावत झालेलीहोती.खाती अद्ययावत करण्याच्या या कामाच्या अखेरीस असे स्पष्ट झाले की, सहा कोटी ५६ लाख ९ खाती चालू आहेत तर आठ कोटी ८ लाख ५६ हजार ४४४ खाती निष्क्रिय आहेत. याखेरीज ८९ लाख ५८ हजार २९६ खातेदारांना त्यांचे सर्व पैसे चुकते करून ती खाती याआधीच बंद करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
१५ कोटी पी.एफ. खात्यांचे हिशेब एकाच दिवसात पूर्ण
By admin | Updated: April 7, 2015 23:17 IST