नवी दिल्ली : भारतात कर्मचाऱ्यांचे पगार २०१५ मध्ये सरासरी १०.९ टक्के वाढतील, असे भाकीत एका आंतरराष्ट्रीय अहवालात वर्तविण्यात आले आहे. तथापि, आशियात पाकिस्तान व व्हिएतनामनंतर भारत सर्वाधिक पगारवाढ देणारा देश होईल.ईसीए इंटरनॅशनलच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, आशियामध्ये पाकिस्तानात सर्वाधिक वेतनवाढ होण्याचा अंदाज आहे. पाकमध्ये कंपन्या सरासरी १२ टक्के पगारवाढ करण्याची शक्यता आहे. भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी १०.९ टक्के वाढ अपेक्षित आहे.तथापि, महागाईचा दर अधिक असतानाही भारतात वेतनवाढीची पातळी आशियात सर्वाधिक आहे. भारताचा महागाई दर ३.४ टक्के आहे.ईसीए इंटरनॅशनलच्या क्षेत्रीय संचालक (आशिया) ली क्वेने यांनी सांगितले की, ‘पुढील वर्षी महागाईचा पारा घटणे अपेक्षित आहे. २०१५ मध्ये यंदाच्या २.७ टक्क्याच्या तुलनेत चांगली पगारवाढ मिळेल.’ महागाईचा निकष लावल्यास आशिया खंडात भारत सातव्या स्थानी असून व्हिएतनाम प्रथम आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर जाईल. दुसरीकडे वेतनवाढीच्या दृष्टीने चीन दुसऱ्या स्थानावर, तर थायलंड चौथ्या, बांगलादेश पाचव्या आणि श्रीलंका सहाव्या क्रमांकावर राहील. जपानी कर्मचाऱ्यांना सर्वांत कमी २.३ टक्के वेतनवाढ मिळेल, असा दावाही या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. चीनमध्ये पुढील वर्षी पुन्हा आठ टक्के वेतनवाढ होईल. महागाई असतानाही येथे कर्मचारी प्रादेशिक व जागतिक पातळीवर वेतनवाढीच्या दृष्टीने सर्वाधिक लाभकारी ठरतील. वास्तविक पाहता यांचे वेतन ५.५ टक्के वाढेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
२०१५ मध्ये १० टक्के पगारवाढ शक्य
By admin | Updated: November 8, 2014 01:33 IST